‘छावा’ चित्रपट एकूण चांगला बनवला आहे. सर्वांनी जरूर पहावा, असा आहे; पण बॉलीवूडच्या रक्तात ‘सेक्युलॅरिजम’चा (निधर्मीवादाचा) कीडा जो भिनलेला आहे, तो इथेही दिसून आलाच ! ‘हमारी लढाई किसी भी धर्म के खिलाफ नहीं है’, असा एक संवाद प्रारंभीलाच आला आहे. तेव्हाच कळले की, चित्रपटाची पुढची दिशा काय असणार आहे. म्हटले इतके तर ठीक आहे. पाहू पुढे काय येते ! संपूर्ण चित्रपटात प्रतिकात्मक स्वरूपात हिंदू संस्कृती ठळकपणे दाखवलेली आहे. मग ते शंभूराजे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतांना असो, गडावरील सजावट असो, शंभूराजे आणि सगळ्या मावळे यांची वेशभूषा असो, ‘जय भवानी’ आणि ‘हर हर महादेव’, या घोषणा असोत. त्याचप्रमाणे ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा !’, हा शंभूराजे यांचा संवाद आणि ‘जहां जहां भगवा दिखाई दे, उसे लाल रक्त में बदल दो’, हा औरंग्याच्या तोंडी टाकलेला संवादही ऐतिहासिक वस्तूस्थितीला धरूनच आहे. पण चित्रपटाचा अंतरात्मा कुठेतरी ‘सेक्युलॅरिजम’च्या रोगाने ग्रस्त असलेला दिसला. तरीही शंभूराजे यांना कैद होईपर्यंत चित्रपट पुष्कळ चांगल्या प्रकारे पुढे जात आहे, असे वाटत होते आणि शेवटी इस्लाम मान्य करण्याच्या अटीवर ४० दिवस प्रचंड यातना देऊन जी हत्या करण्यात आली, ते निर्विवाद ऐतिहासिक सत्य समोर आणले जाईल, असे वाटत होते; परंतु शेवटपर्यंत दुर्दैवाने दिग्दर्शकाच्या मेंदूला चिकटून राहिलेला ‘सेक्युलॅरिजम’चा कीडा काही सुटलेला दिसला नाही.

शंभूराजे यांना इस्लाम धर्म मान्य करण्याविषयीचे संवाद शेवटपर्यंत निधर्मीपणामुळे दाखवले नाहीत !
वस्तूस्थिती अशी आहे की, शंभूराजे यांना कैद केल्यानंतर अगदी प्रारंभीच औरंग्याने विचारले होते, ‘इस्लाम मान्य केले, तर सुटका होईल.’ शंभूराजेंची धर्मनिष्ठा काही ‘राईस बॅग कॉन्व्हर्ट’सारखी हलक्या दर्जाची नव्हती. औरंगजेब एक एक अत्याचार करण्याचे फर्मान काढायचा आणि ‘इस्लाम मान्य करणार का ?’, ते विचारले जायचे. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ केले आणि ‘इस्लाम मान्य करणार का ?’, ते विचारले. रक्तबंबाळ झालेल्या अंगावर मीठ टाकले आणि ‘इस्लाम मान्य करणार का ?’, ते विचारले. नखे काढली आणि ‘इस्लाम मान्य करणार का ?’, ते विचारले. जीभ छाटली आणि ‘इस्लाम मान्य करणार का ?’, ते विचारले. शेवटी डोळ्यात तापलेल्या सळ्या घातल्या आणि अतिशय क्रौर्य पद्धतीने हत्या केली. शंभूराजे ‘धर्मवीर’ ठरले आणि हिंदूंच्या पुढील १०० पिढ्यांना धर्मनिष्ठ बनवून गेले.
परंतु चित्रपटात अगदी शेवटी डोळेही फोडल्याच्या नंतर औरंगजेब विचारतो, ‘धर्म पालटला आणि आमच्या बाजूने आला, तर जिवंत रहाशील.’ इथेही ‘इस्लाम’ असा उच्चार येत नाही. जो चित्रपटाचा मुख्य गाभा असायला हवा होता, तो शेवटच्या सिनमध्ये अगदी तळटीप आल्यासारखा येतो. यापुढेही ‘सेक्युलॅरिजम’ची परिसीमा, म्हणजे शंभूराजे यांच्या तोंडी संवाद दाखवला आहे, ‘तू आमच्या बाजूने ये. तुला धर्मही पालटावा लागणार नाही.’ इथे मात्र चित्रपटाने घोर निराशा केली. या विकृत ‘सेक्युलॅरिजम’च्या आत्मघातकी कर्करोगामधून हिंदूंची लवकरात लवकर सुटका होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !
– श्री. भरत आमदापुरे, अभियंता, पुणे. (१६.२.२०२५)