प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं स्वित् एकपदं यश: ? किं स्विद़् अस्य परायणम् ।
अर्थ : यश आणि कीर्ती यांचे अधिष्ठान कोणते ? माणसाच्या जीवनाचा आश्रय कोणता ?
उत्तर : दानम् ।
१. दान निरपेक्ष असावे !
दानामुळे कीर्ती मिळते-वाढते हे खरेच; पण कीर्ती व्हावी; म्हणून दान देणे, हे चांगले नाही. तसे केलेले दान हा एक प्रकारचा धंदाच ठरेल. दान निरपेक्षपणे केलेले असले पाहिजे. अतिरिक्त उत्पन्न कर वाचवण्यासाठी एखाद्या संस्थेला दान द्यावे आणि ‘त्यातही आपल्या नावाची पाटी झळकवण्याची अभिलाषा बाळगावी’, हे काही खरे दान नाही. श्रीमद़्शंकराचार्यांनी ‘किं दानमनाकांक्षम् ।’, म्हणजेच ‘दान कसे असावे ?’, तर ‘निरपेक्ष असावे’, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
२. दान करणार्याची वृत्ती कशी असावी ?
दान हेच मनुष्याचे वैशिष्ट्य आहे. मनुष्याच्या ठिकाणी संग्रही प्रवृत्ती नैसर्गिकपणे असते; पण त्या संग्रहाचा उपयोग दानासाठी झाला, तरच ते मनुष्याचे जीवन ठरते. ‘मनुष्याचा सज्जनपणा हीच त्याची माणुसकी आहे.’ नुसती शरीररचना आणि शरीरक्रिया माणसासारखी असणे, हा प्राणीविशेष झाला. माणुसकी यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. सज्जन मनुष्य देण्यासाठी, त्यागासाठी आणि दानासाठी संग्रह करतो. त्याची वृत्ती मेघासारखी असते आणि असली पाहिजे.
‘आदानं हि विसर्गाय सतां वारिमुचामिव ।’ (रघुवंश, अंक ४, श्लोक ८६), म्हणजे ‘ज्याप्रमाणे ढग पाणी साठवून न ठेवता त्याचा विसर्ग करतात, त्याप्रमाणे सज्जन लोक आपल्याकडे आलेल्या गोष्टींचा साठा न करता त्या वाटतात’, असे संत कालिदास म्हणतात. धनसंग्रहाची बुद्धी आणि कुशलता सर्वांनाच उपलब्ध असते, असे नाही. ज्यांना ती निसर्गतः लाभली आहे किंवा ज्यांनी ती अभ्यासाने मिळवली आहे, त्यांनी श्रीमंती अवश्य मिळवावी; पण तिला शोभेसा दानधर्मही करावा. स्वार्थबुद्धी ही जीवनाधार असू नये. जीवनाला आधार असावा, तो औदार्याचा; म्हणून दानाला मनुष्याचे ‘परायण’, ‘परमाश्रय’, असे म्हटले आहे.
३. धर्मशास्त्राप्रमाणे उत्पन्नाचे विभाजन
धर्मशास्त्राने मिळवणार्या उत्पन्नाचे स्वतःचा प्रपंच, समाजातील प्रतिष्ठा, आप्तेष्टांना साहाय्य, राजाला द्यायचा कर आणि दानधर्म असे ५ भाग पाडले आहेत. यासाठी काय आणि किती द्यावे, त्याचे प्रमाण सांगितले आहे. ‘प्रपंचासाठी आवश्यक तेवढा व्यय अवश्य केला पाहिजे. उत्पन्नाचा सहावा भाग राजाला कर म्हणून दिला पाहिजे आणि शेष राहील, त्याचा दानधर्म केला पाहिजे’, असे धर्मशास्त्राने सांगितले आहे. परिस्थिती आणि उत्पन्न यांच्या प्रमाणात हे थोडे उणे-अधिक होईल; पण धोरण असे असावे. सद्यःस्थितीत असे वागणे मोठे अवघड झाले आहे; कारण धर्मशास्त्राप्रमाणे राजाचे १/६ वर भागत नाही. एक षष्ठांश, म्हणजे १६ ते १७ टक्के होतात. प्रत्यक्ष कराचे स्वरूप एवढेच आणि अप्रत्यक्ष कर तर नव्हतेच.
दानधर्मासाठी बहुधा काळे धनच वापरले जाते. लोकांचे जीवन, म्हणजेच मनुष्यमात्रांचे जीवन प्रामाणिकपणे जर दानशील होईल, तर शासनातही सुधारणा होऊ शकेल. ‘लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे शासन मिळते’, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. आजचे शासन भ्रष्ट आहे, यात शंकाच नाही; परंतु आपण आपले जीवनही पारखून घेतले पाहिजे. आपण सुधारल्याविना समाज किंवा शासन सुधारण्याची अपेक्षा बाळगणे योग्य नाही.
धर्मशास्त्राने ‘संपत्तीचे ८ किंवा १२ भाग करायचे. त्यातील निम्मे प्रपंचाकरता व्यय करायचे, जे उर्वरित राहील, त्यात भविष्यकाळ, आप्तेष्ट, लौकिक, राजाची करभरणी आणि दानधर्म इत्यादींकरता समप्रमाणात विभागणी करावी’, असे सांगितले आहे. हे सगळे जर आपण लक्षात ठेवले आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणू शकलो, तर आयकर विभागाला काही कामच रहाणार नाही. हे तेव्हाच कार्यवाहीत येऊ शकेल की, जेव्हा चांगले, कार्यक्षम आणि प्रामाणिक शासन सत्तेवर येईल; पण निकटच्या भविष्यकाळात, तरी अशी शक्यता फारशी दिसत नाही. आपणच स्वतः जितके चांगले रहाता येईल, तेवढे राहूया.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)