२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहलीत होत आहे. मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद़्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख…
सावंतवाडीचे कवी वसंत सावंत यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे, ‘अशा लाल मातीत जन्मास आलो । जिचा रंग रक्तास दे चेतना ॥’ कोकणची ही माती खरोखरच चैतन्यदायी आहे. येथील कवी, लेखक, इतिहास संशोधक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ यांनी भरतभूमीला आपल्या कर्तृत्वाने विविध आभूषणे अर्पण केली. मराठी भाषा अभिजात होण्यासाठी या अपरांत (पश्चिमेकडील) भूमीतील अनेक साहित्यिकांनी विविध अलंकार घातले.
१. मराठी भाषेच्या वृत्तपत्र क्षेत्रात कोकणभूमीचे योगदान
भारतावर इंग्रजी प्रभाव बसू लागला होता. पाश्चात्त्य देशांची दारे खुली व्हायला लागली होती. अशा वेळी समाजातील गतानुगतिकता (आहे तसे चालू ठेवण्याचा विचार) संपून नवविचारांना सामोरे जाण्यासाठी प्रबोधनाचे माध्यम म्हणून वृत्तपत्राची आवश्यकता आहे, हे जाणून कोकणातील एक महापुरुष पुढे आले. ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर ! इ.स. वर्ष १८३२ मध्ये त्यांनी ‘दर्पण’ साप्ताहिक चालू केले. बाळशास्त्री हे देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावी जन्मले. त्यांनी साप्ताहिक ‘दर्पण’मधून स्त्रियांना शिक्षण, विधवा विवाह अशा अनेक समस्यांवर जनमानसात जागृती करण्यासाठी प्रयत्न केला. रूढींची बेडी तोडल्याविना गत्यंतर नाही; म्हणून आपल्या ‘शतपत्रां’मधून रूढीग्रस्तांवर चाबूक उगारणारे लोकहितवादी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आणि त्यांची शतपत्रे तितक्याच निर्भयतेने प्रसिद्ध करणारे भाऊ महाजन हे रायगड जिल्ह्यातील पेण गावी जन्मले. वर्ष १८४१ मध्ये त्यांनी ‘प्रभाकर’ साप्ताहिक चालू केले.
रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वृत्तपत्र चालू केले, ते जनार्दन हरि आठल्ये यांनी ! ‘जगन्मित्र’ साप्ताहिक, म्हणजे त्या काळी ‘रत्नागिरी गॅझेट’ म्हटले जायचे. मराठी भाषेच्या वृत्तपत्रीय योगदानात कोकणभूमी अग्रेसर होती.
२. इतिहास आणि खगोलशास्त्र यांत कोकणातील साहित्यिकांचे योगदान !
‘जागतिक पातळीवर स्वतःच्या संशोधनाला मान्यता मिळाली पाहिजे, यासाठी संशोधन ‘आंग्ल’ (इंग्रजी) भाषेत प्रसिद्ध करायला हवे; मात्र मला माझे संशोधन माझ्या मराठी बांधवांना कळायला हवे; म्हणून मी मराठी भाषेतच लिहीन’, हा विचार करून इतिहास संशोधकाचे अवाढव्य काम केले इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी ! इतिहासाचार्य मूळचे देवरुखचे. पुढे त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यात वरसईला गेले. त्यांच्याप्रमाणे वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई, वा.वि. मिराशी, दत्तो वामन पोतदार अशा कोकणातील अनेक संशोधकांनी स्वत:च्या संशोधनाने आणि लेखनाने मराठी भाषा समृद्ध केली. इतिहासाच्या इतकेच खगोलशास्त्रालाही कोकणभूमीने महत्त्वाचे योगदान दिले
स्वातंत्र्य आंदोलनातील धगधगता अंगार म्हणजे लोकमान्य टिळक ! लोकमान्यांनी खगोलशास्त्रातही फार मोठे कार्य केले. त्यांचा ‘आर्यांचे मूलस्थान’ हा खगोलशास्त्रावर आधारित ग्रंथ जगभर गाजला. दापोली तालुक्यातील मुरुड गावी जन्मलेल्या शं.बा. दीक्षित यांनी वर्ष १८९६ मध्ये ‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’ हा संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केला. इतिहास संशोधक फ्लिटने म्हटले आहे, ‘गुप्त साम्राज्याचा काळ शोधण्यासाठी मला शं.बा. दीक्षित यांचा उपयोग झाला.’
३. मराठी भाषा समृद्ध होण्यात कोकणातील प्रादेशिक बोलीभाषांचे योगदान
मराठी भाषा समृद्ध होण्यात मोठा वाटा आहे, तो प्रादेशिक बोलीभाषांचा ! महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. कोकणातही मालवणी, दालदी, कातोडी, सामवेदी, चित्पावनी, तिल्लोरी कुणबी अशा अनेक बोलींनी मराठी भाषेचा गंगौघ समृद्ध केला आहे. आचार्य विनोबाजींनी गीता मराठी भाषेत आणली, तर वालावलचे अर्जुन बळवंत वालावलकर यांनी गीतेचे मालवणी बोलीत रूपांतर केले. चिपळूणचे नामवंत कवी आणि लेखक वि.ल. बरवे यांनी आपल्या ‘मुचकुंददरी’ कादंबरीत कुणबी बोलीचा वापर केला. श्री. अरुण इंगवले यांनी कुणबी बोलीतील १० सहस्रांहून अधिक शब्द वाक्प्रचारांच्या कोशाचे काम केले आहे. ह.मो. मराठे यांच्या ‘बालकांड’ आत्मचरित्रात आपल्याला चित्पावनी बोलीचे दर्शन घडते. जयवंत दळवी, श्री.ना. पेंडसे यांच्या कथा कादंबरीत अस्सल कोकणी भाषेचा झणझणीत अनुभव येतो.
आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत असोत वा चरित्र लेखनाचा मानदंड निर्माण करणारे धनंजय कीर, अशा अनंत अपरांतपुत्रांनी अभिजात भाषेत भरभरून योगदान दिले आहे.
– श्री. प्रकाश देशपांडे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१४.२.२०२५)