साहित्‍य संमेलनाने राजकारण्‍यांच्‍या जोखडातून मुक्‍त होऊन मराठीजनांसाठी कृतीशील व्‍हावे !

आजपासून देहली येथे चालू होत असलेल्‍या ९८ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या निमित्ताने…

मराठीजन आणि चोखंदळ साहित्यिक ज्‍याची वर्षभर आतुरतेने वाट पहातो, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्‍र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देहली येथे होत आहे. केंद्रशासनाने मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा दिल्यानंतरचे हे संमेलन प्रथम संमेलन आहे. या संमेलनात मराठीजनांना कोणती साहित्यिक मेजवानी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकीकडे हे संमेलन जरी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देहली येथे होत असले, जरी मराठी भाषिकांचे उर भरून येत असेल, तरी गेली दोनहून अधिक दशके या संमेलनावर राजकारण्यांचाच पगडा अधिक आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने प्‍रत्येक संमेलनाच्या विचारपिठावर साहित्यिकांना नाही, तर राजकारण्यांनाच मानाचे स्थान असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. अलीकडच्या साहित्य संमेलनांमधून मराठीच्या उत्‍कर्षासाठी ठोस असे काहीच होत नसून तो एक ‘मौजमजेचा उत्सव’ झाला आहे !

१. संमेलनाध्‍यक्ष वर्षभर काय करतात ?

सांगलीत झालेल्‍या ८१ व्‍या साहित्‍य संमेलनात संमेलनाध्‍यक्षपद हे म.द. हातकणंकलेकर यांच्‍याकडे होते आणि आता परत एकदा सांगलीतील डॉ. तारा भवाळकर यांच्याकडेच आले आहे. जेव्हा म.द. हातकणंगलेकर यांच्याकडे हे पद होते, तेव्हा वर्षभरात मराठीवर होत असलेल्या अन्यायाविषयी अथवा नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्याविषयी त्यांच्याकडून फारसे काही झाले, असे नव्हते. इतकेच काय, तर आता जे संमेलनाध्यक्ष होतात, ते पुढे वर्षभर काय करतात ? हा एक संशोधनाचाच विषय आहे ! पूर्वीची मतदानाची पद्धत पालटून आता संमेलनाध्यक्षांची निवड ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारीच करतात. हे पदाधिकारी जे साहित्यिक असून खरोखरच मराठीसाठी काम करणार्‍या संमेलनाध्यक्षांची निवड करतात का ? यावर मोठे प्रश्नचिन्हच आहे.

श्री. अजय केळकर

२. यंदाच्‍या संमेलनात ‘श्री सरस्‍वतीदेवी’चे पूजन होणार ना ?

खरे पहाता साहित्‍यिक, म्‍हणजेच सारस्‍वत म्‍हणजेच सरस्‍वतीपुत्र होय ! दुर्दैवाने हिंदु धर्मातील देवतांचा तिटकारा असलेल्‍यांच्‍या हातात संमेलनाच्‍या दोर्‍या गेल्‍याने संमेलनांमधून श्री सरस्‍वतीदेवीचे पूजन गायब होतांना दिसत आहे. गेल्‍या काही संमेलनांमध्‍ये मराठी भाषेच्‍या संवर्धनासाठी, रक्षणासाठी प्रयत्न, त्‍याची दिशा यांपेक्षा हिंदु धर्मावर टीका, संमेलनाचा ‘सर्वधर्मसमभाव’ राखण्‍यासाठी त्‍यात ‘सरस्‍वतीपूजन टाळणे’, दीपप्रज्‍वलन यांत्रिक पद्धतीने करणे, हिंदु धर्म, देवता यांच्‍यावर टीका असलेल्‍या पुस्‍तकांचा विक्री प्रदर्शन कक्षांमध्‍ये समावेश असणे, असे होत आहे.

३. मराठी साहित्‍यासाठी योगदान नसलेल्‍या राजकारणार्‍यांना संमेलनात का बोलावले जाते ?

गेली अनेक वर्षे जवळपास प्रत्‍येक साहित्‍य संमेलनात राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार हे असतातच ! आता ‘त्‍यांचे मराठी भाषा आणि साहित्यासाठी योगदान काय ?’, असे विचारल्यास त्याचे उत्तर नकारार्थीच आहे ! याउलट हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या, हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या मासिक ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यासारख्यांच्या विचारपिठावर ते हमखास दिसतात ! शरद पवार यांनी महाराष्ट्‍राचे मुख्यमंत्रीपद भूषवले असून त्यांच्याच कालावधीत सीमावादाचे घोंगडे भिजत पडलेले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष काय केले ? साहित्यिकांसाठी त्यांनी काय केले ? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच येतील ! बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायासाठी त्यांनी अथवा त्यांच्‍या पक्षाने भरीव कार्य केल्‍याचे ज्ञात नाही. त्‍यामुळे अशांना संमेलनाचे आयोजक कशासाठी बोलावतात ?, असा प्रश्‍न मराठीप्रेमींनी आयोजकांना ठामपणे विचारण्याची नितांत आवश्यकता
झाली आहे.

४. दर्जाहीन कार्यक्रम पालटून ठोस कृतींवर चर्चा अपेक्षित !

सध्‍याच्‍या साहित्‍य संमेलनांमध्‍ये जे कार्यक्रम सादर होतात, त्‍यातून मराठीजनांच्‍या वाट्याला तर काहीच येत नाही. वास्‍तविक प्रत्‍येक क्षेत्रात मराठीचा वापर वाढवणे आणि मराठी शाळांच्‍या समस्‍या, त्‍यांची गुणवत्ता सुधारणे यांवर सांगोपांग चर्चा अपेक्षित असते. असे कोणतेच चर्चासत्र या संमेलनात होत नाहीत. जणू काही या संमेलनास मराठी शाळांच्‍या दुरवस्‍थेशी, भाषेतील वाढत्‍या इंग्रजी आक्रमणाशी काही देणे-घेणेच नाही, अशीच स्थिती असते. त्यामुळे पहिला दिवस सोडला, तर मुख्य मंडपासह अनेक छोटे छोटे मंडप जिथे समांतर कार्यक्रम होतात, ते रिकामेच असतात. याउलट खाण्या-पिण्याच्या कक्षावर मात्र भरभरून गर्दी असते.

५. मराठी भाषेसाठी संमेलनाध्‍यक्ष आणि साहित्यिक काय करणार आहेत ?

केंद्रशासनाने मराठीला आता ‘अभिजात भाषेचा दर्जा’ दिला आहे. मराठीला केवळ दर्जा मिळाला इतके पुरेसे नसून प्रत्यक्षात मराठी शाळांची दुरवस्था, प्रसिद्धीमाध्यमांमधून मराठीचा खालावत चाललेला दर्जा, मराठी नावाच्या पाट्यांविषयी अद्यापही ठोस भूमिका नसणे यांसारख्या अनेक समस्या ‘आ’वासून समोर आहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून त्यासाठी संमेलनाध्यक्‍ष, साहित्यिक काय करणार आहेत ? हाही या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

‘मराठी’ सोडून जर संमेलने भलत्‍याच दिशेने भरकटत असतील, तर आता मराठीप्रेमी, मराठीजन, सरस्‍वतीपुत्र (साहित्यिक) यांनी सजग होऊन जाब विचारण्‍याची वेळ आली आहे. असे झाले, तरच ज्या उद्देशाने संमेलन भरवले, जाते ते यशस्वी होईल ! साहित्य महामंडळ अन् अध्यक्‍ष यांना यंदाच्या संमेलनात प्रत्यक्‍ष कृतीप्रवण होण्याची प्रेरणा आणि सद्बुद़्‍धी व्हावी, अशी श्री सरस्वतीद़ेवी आणि श्री गणेश यांच्या चरणी प्रार्थना !

– श्री. अजय केळकर, कोल्‍हापूर (१६.२.२०२५)