सनातन संस्‍थेचा रौप्‍य महोत्‍सव आणि प.पू. स्‍वामी गोविंददेवगिरि महाराज यांच्‍या अमृतमहोत्‍सवाच्‍या निमित्ताने श्री गुरूंनी करून घेतलेली सेवा अन् आलेल्‍या अनुभूती

श्री. संगम बोरकर

१. सेवेमध्‍ये अनेक प्रकारच्‍या वैयक्‍तिक अडचणी असतांना गुरुकृपेने सकारात्‍मक विचार येऊन सेवा करता येणे 

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुुरुदेवांच्‍या कृपेने मला ३०.११.२०२४ या दिवशी गोव्‍यात होणार्‍या सनातन संस्‍थेच्‍या रौप्‍य महोत्‍सवी कार्यक्रमामध्‍ये सेवा करण्‍याची संधी मिळाली. प्रत्‍यक्षात या कालावधीत मला कौटुंबिक अडचणी, नोकरीवरील कामे आणि शारीरिक व्‍याधी चालू होत्‍या. मला गुरुदेवांच्‍या कृपेने या सोहळ्‍यात सेवा करण्‍याची संधी आणि दायित्‍व मिळाले. तेव्‍हा ‘काहीही झाले, तरी गुरुदेवच सर्व अडचणी असल्‍या तरी माझ्‍याकडून सेवा करून घेणार आहेत’, हा सकारात्‍मक विचार गुरुदेवांनी मला दिला आणि मी श्री गुरुचरणी शरण जाऊन सेवेला प्रारंभ केला.

१ अ. नोकरीतील अडचणी दूर होणे : रौप्‍य महोत्‍सवाच्‍या कालावधीत नोकरीच्‍या ठिकाणी काही महत्त्वाची कामे आणि विद्यार्थ्‍यांच्‍या परीक्षा होत्‍या. त्‍यामुळे मला सुटी मिळणे आरंभी अडचणीचे वाटत होते; मात्र गुरुदेवांच्‍याच कृपेमुळे मला या पूर्ण कालावधीत सुटी घेऊन सेवा करता आली. ही फार मोठी गुरुकृपा आहे.

१ आ. कौटुंबिक अडचणी आणि शारीरिक व्‍याधी गुरुदेवांनी दूर केल्‍या. त्‍यामुळे मला सेवा निर्विघ्‍नपणे करता आली.

२. गुरुदेवांनी व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न करवून घेणे 

सेवेची व्‍याप्‍ती वाढत असल्‍याने आरंभी ‘सेवेला प्राधान्‍य द्यावे’, असा विचार माझ्‍या मनात येत होता; मात्र ‘व्‍यष्‍टी साधना चांगली असेल, तरच समष्‍टी साधना परिणामकारक होऊ शकते’, हे गुरुदेवांचे वाक्‍य आठवून व्‍यष्‍टीच्‍या प्रयत्नांना प्राधान्‍य देऊन सेवा करण्‍याचा प्रयत्न झाला. यातून गुरुदेवांनी व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी सेवाही करून घेतली अन् सेवा करतांना सेवेतील आनंदही घेता आला.

३. सनातन संस्‍थेच्‍या कार्याचा परिचय करून देण्‍याची सेवा गुरुदेवांच्‍या कृपेने लाभणे  

सोहळ्‍याच्‍या काही दिवसांपूर्वी गुरुदेवांच्‍या कृपेने मला या सोहळ्‍यात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अद्वितीय कार्य आणि सनातन संस्‍थेच्‍या कार्याचा परिचय’, हा विषय मांडण्‍याची सेवा मिळाली. माझ्‍यासारख्‍या सामान्‍य सेवकाला ही सेवा दिल्‍याबद्दल गुरुदेवांच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. त्‍या क्षणापासून माझ्‍याकडून सर्व सेवा अधिक कृतज्ञताभावानेच होऊ लागल्‍या. ‘सूत्रसंचालन संहिता बनवणे आणि समन्‍वय करणे’, या सेवा चालू असल्‍याने मला प्रत्‍यक्ष विषयाचा सराव करायला वेळ मिळत नव्‍हता. त्‍या वेळी ‘गुरुदेव करून घेणार आहेत. मला त्‍यांना शरण जाऊन सेवा करायची आहे’, असा विचार गुरुदेवांनीच मला दिला.

४. सच्‍चिदानंद परब्रह्म परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी यांना भावपूर्ण प्रार्थना होणे 

प्रत्‍यक्ष कार्यक्रमात माझ्‍याकडून गुरुदेव, विघ्‍नहर्ता श्री गणेश आणि माता श्री सरस्‍वतीदेवी यांना शरण जाऊन कळकळीने प्रार्थना झाल्‍या. प्रत्‍यक्ष विषय मांडत असतांना ‘साक्षात् माता श्री सरस्‍वतीदेवीची वाणी कार्य करत आहे आणि श्री सरस्‍वतीदेवीच माझ्‍या मुखातून बोलत आहे’, असे मला जाणवत होते. त्‍या वेळी ‘माझे काही अस्‍तित्‍व नाही आणि इथे गुरुदेवांचेच अस्‍तित्‍व आहे’, अशी अनुभूती मला येत होती.

‘हे गुरुदेव, तुम्‍हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना तुम्‍हीच माझ्‍याकडून करवून घ्‍या’, अशी आपल्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.

श्रीगुरुचरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !’

– श्री. संगम प्रफुल्ल बोरकर, फोंडा, गोवा. (२.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक