Elon Musk’s Role In White House : इलॉन मस्क हे सरकारचे केवळ सल्लागार असून ते अधिकृत निर्णय घेऊ शकत नाहीत ! – व्हाईट हाऊस

राष्ट्राध्यक्ष कार्यालय ‘व्हाईट हाऊस’चे न्यायालयात स्पष्टीकरण

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क हे केवळ राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे (‘डीओजीई’चे) कर्मचारी नाहीत, म्हणून त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्राध्यक्ष कार्यालय ‘व्हाईट हाऊस’ने न्यायालयात दिले. न्यू मेक्सिकोच्या नेतृत्वाखालील १४ अमेरिकी राज्यांनी ट्रम्प आणि मस्क यांच्याविरुद्ध वॉशिंग्टनमधील फेडरल न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे.

मस्क यांची ‘डीओजीई’चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने ही राज्ये नाराज आहेत. या राज्यांच्या मते, मस्क यांनी प्रचंड शक्ती मिळवली आहे, जी अमेरिकी राज्यघटनेचे उल्लंघन आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांना सरकारी कर्मचारी काढून टाकण्यासाठी आणि एकाच वेळी संपूर्ण विभाग रहित करण्यासाठी दिलेले अमर्याद अधिकार या देशाला स्वातंत्र्य देणार्‍या लोकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरले असते.