महाकुंभमेळा विशेष
हिंदु धर्मामध्ये धर्मग्रंथ हे केवळ पवित्र ग्रंथ नाहीत, तर ते जीवनाविषयीचे मार्गदर्शन, आत्म्याची शुद्धी आणि मोक्षप्राप्ती यांचे साधन आहेत. सनातन धर्मातील सर्वांत भव्य असलेला कुंभमेळा हा या ग्रंथातील शिकवणीचे सार आणि सजीव उत्सव आहे. महाभारत, रामायण, वेद, उपनिषदे आणि पुराणे यांच्यामध्ये केवळ तीर्थयात्रा अन् अमृतस्नान यांची परंपरा यांचा उल्लेख नाही, तर कुंभमेळ्याचे मूळ सिद्धांत, श्रद्धा, समर्पण आणि सत्याचा शोध यांचेही सखोल विश्लेषण आहे. या लेखामध्ये आपण ग्रंथांमध्ये कुंभमेळा आणि त्याच्याशी संबंधित परंपरा यांचे काय महत्त्व आहे अन् तो कशा प्रकारे आधुनिक समाजासाठीही उपयोगी आहे, यांविषयी सखोल विश्लेषण केले आहे.
१. वेदांमध्ये कुंभमेळा आणि नद्या यांना असलेले महत्त्व
अ. ऋवेद : ऋवेदामधील नदी सूक्तामध्ये नद्यांची पवित्रता आणि महिमा याचे वर्णन केले आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा उल्लेख पवित्र जलस्रोतांच्या रूपात केलेला आहे. नदी स्नानाला केवळ शरिराची नव्हे, तर आत्म्याची शुद्धी करण्याचे साधन म्हटले आहे.
आ. यजुर्वेद : यजुर्वेदामध्ये ‘यज्ञ आणि तीर्थयात्रा ही मोक्षप्राप्तीची साधने आहेत’, असे म्हटले आहे. तीर्थाला केवळ एक स्थान म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक अनुभवाच्या रूपात बघितले गेले आहे. यज्ञांमध्ये आत्म्याच्या शुद्धीसाठी नद्यांच्या जलाचा उपयोग आवश्यक मानला गेला आहे.
इ. अथर्ववेद : अथर्ववेदामध्ये ‘जल आणि नदीतील स्नान यांना रोग अन् पाप मुक्ती यांचे साधन’, असे म्हटले आहे.
वेदांमध्ये नद्यांना ‘देवी’ आणि पाण्याला ‘अमृत’, असा दर्जा दिला आहे. कुंभमेळ्याच्या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती यांसारख्या पवित्र जलस्रोतांचे महत्त्व याच वैदिक परंपरेने प्रेरित आहे.

२. उपनिषदांमधील तीर्थयात्रा आणि आत्म्याची शुद्धी यांविषयीचा उल्लेख
अ. ‘बृहदारण्यक’ उपनिषद : या उपनिषदामध्ये आत्मा आणि ब्रह्म यांचे मिलन हा तीर्थयात्रा अन् ध्यान यांचा परिणाम मानला गेला आहे. आत्म्याची शुद्धी आणि मोक्षप्राप्ती यांसाठी जल अन् ध्यान ही माध्यमे आहेत, असे मानले गेले आहे. तीर्थयात्रेला बाह्य आणि आंतरिक यात्रेचा संगम असे म्हटले आहे.
आ. कठोपनिषद : या उपनिषदामध्ये तीर्थयात्रेला ‘आत्म्याची शुद्धी’ आणि ‘ध्यानाचे माध्यम’, असे म्हटले आहे. तीर्थाला भौतिक स्थळ नव्हे, तर अंतरात्म्याच्या शोधाच्या रूपात पाहिले गेले आहे.
इ. छांदोग्य उपनिषद : आत्म्याच्या शुद्धीसाठी नदीस्नान आणि तप :श्चर्या यांचा उल्लेख यामध्ये आहे. गंगा आणि सरस्वती यांच्या महत्त्वाला आत्मिक ज्ञानाशी जोडले गेले.
उपनिषदांमध्ये तीर्थयात्रा आणि स्नान यांचा उल्लेख कुंभमेळ्याच्या परंपरेला वैदिक दर्शनाशी जोडले आहे.
३. रामायणामध्ये तीर्थयात्रा आणि नदीस्नान यांचे महत्त्व
अ. गंगा आणि प्रयागराज यांचा उल्लेख : रामायणामध्ये गंगा स्नान आणि प्रयागराज येथील भारद्वाजमुनींच्या आश्रमाचे वर्णन आहे. भगवान श्रीरामाच्या वनवासाच्या वेळी गंगेच्या पवित्र जलाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. भारद्वाजमुनी यांनी संगमाला ‘तीर्थराज’ हा दर्जा दिला.
आ. गोदावरी आणि पंचवटी : रामायणात गोदावरी नदीचा उल्लेख पवित्र नदीच्या रूपात केला आहे. पंचवटीमध्ये सीता आणि राम यांचे निवासस्थान गोदावरीच्या तीरावर होते. यावरून रामायणातील तीर्थयात्रा आणि नद्या यांचे महत्त्व कुंभमेळ्याच्या परंपरेचा आधार ठरते.
४. महाभारतात कुंभमेळा आणि तीर्थयात्रा यांचा उल्लेख
महाभारताच्या ‘वनपर्वा’मध्ये युधिष्ठिराने तीर्थयात्रेचा उल्लेख केला आहे. संगम क्षेत्राचे महत्त्व आणि गंगा स्नानाचा महिमा, म्हणजे स्नान अन् यज्ञ आत्म्याला शुद्ध करतात. ‘अमृतमंथनामध्ये निघालेले अमृत कलशातून प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या स्थानांवर अमृताचे थेंब पडले’, याचा उल्लेख या पर्वाच्या कथेमध्ये आहे. महाभारतामध्ये तीर्थयात्रेला धर्माचे पालन आणि आत्म्याची शुद्धी यांचे माध्यम मानले गेले आहे.
५. पुराणांमध्ये कुंभमेळा आणि तीर्थक्षेत्रांचे विवरण
अ. भागवत पुराण : यामध्ये अमृतमंथन आणि अमृतकलशाचे रक्षण यांचा उल्लेख आहे. कुंभमेळ्यांच्या स्थळांचा पौराणिक संदर्भ आहे.
आ. स्कंद पुराण : यात प्रयागराजला ‘तीर्थांचा राजा’ असे म्हटले आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाचा महिमा सांगितला आहे.
इ. पद्म पुराण : यामध्ये दान, तप :श्चर्या आणि पुण्य संपादन करण्याचे महत्त्व सांगितले आहे.
पुराणांमध्ये कुंभमेळ्याला धर्म, संस्कृती आणि पुण्य संपादन करण्याचा महोत्सव मानले जाते.
६. अन्य ग्रंथामध्ये कुंभमेळा आणि तीर्थयात्रा यांचा उल्लेख
अ. मनुस्मृति आणि धर्मशास्त्र : यामध्ये तीर्थयात्रा आणि दान यांचे विधान आहे. स्नानाला पापांपासून मुक्तीचे साधन म्हटले आहे.
आ. योग आणि तंत्रशास्त्र : यामध्ये कुंभमेळ्यामधील योग आणि ध्यान यांची भूमिका सांगितली आहे. शरीर आणि आत्मा यांच्या संतुलनासाठी नदीस्नान सांगितले आहे.
इ. नाट्यशास्त्र : यामध्ये कुंभमेळ्याच्या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकनाट्य यांचा उल्लेख आहे.
७. निष्कर्ष
कुंभमेळा हा हिंदु धर्मग्रंथातील शिकवणीचे सार आहे. हा केवळ आत्म्याची शुद्धी नव्हे, तर समाज, संस्कृती आणि मानवता यांचा उत्सव आहे. आधुनिक युगामध्ये कुंभमेळ्याचे महत्त्व धर्मग्रंथातील संदेशाला जिवंत ठेवतो. कुंभमेळा वेद, उपनिषद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांमधील शिकवण एकत्र आहे. कुंभमेळा हा भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धी दाखवतो.
– डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’.