आईची (पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे यांची) सेवा शिष्यभावाने करणार्‍या फोंडा, गोवा येथील श्रीमती इंदुबाई भुकन (वय ६० वर्षे) !

‘पू. (कै.) शेऊबाई लोखंडेआजी (सनातनच्या संत ६४ व्या संत आणि माझी आजी) त्यांच्या मुलीच्या (माझी आई, श्रीमती इंदुबाई भुकन, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के यांच्या) समवेत, फोंडा (गोवा) येथील घरी रहात असत. त्यांच्या समवेत त्यांच्या २ नातसुना सौ. उर्मिला रामेश्वर भुकन आणि सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) रहातात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे

१. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार आईने ‘पू. लोखंडेआजींची शिष्या’ या भावाने पू. आजींची सेवा करण्यास आरंभ करणे

एकदा माझ्या आईला प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या आईने प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘मी पूर्ण दिवस घरी असते. तिथे मी धान्य निवडण्याची सेवा आणि माझ्या आईची (पू. लोखंडेआजी यांची) सेवा करते. माझ्या साधनेतील पुढील प्रगतीसाठी मी आणखी सेवा करायला हवी’, असे मला वाटते.’’ तेव्हा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘पू. आजींचे सर्व करणे’, ही तुमची मुख्य सेवा आहे आणि त्यातून वेळ मिळाल्यास तुम्ही धान्य निवडण्याची सेवा करा. त्या तुमच्या आई आहेत आणि त्या संतही आहेत. ‘त्या तुमच्या गुरु आहेत’, या भावाने त्यांची सेवा करा.’’ त्यानंतर माझी आई पू. आजींची सेवा अधिक भावपूर्ण करू लागली.

श्रीमती इंदुबाई भुकन

२. पू. आजींनी साधकाच्या आईला तिच्या चुका लगेच सांगणे

माझ्या आईचे काही चुकत असल्यास पू. आजी माझ्या आईला तत्परतेने चुका सांगत असत आणि आम्हालाही आईच्या चुका सांगत. माझ्या आईकडून काही चुका वारंवार होत असल्यास पू. आजी तिला रागवत असत.

३. साधकाला आईमध्ये जाणवलेले पालट

३ अ. पू. लोखंडेआजींमुळे आईची जेवणातील आवड-नावड न्यून होणे : पू. आजींना भाजीत तिखट घातलेले चालत नसे, तसेच त्यांना अन्नपदार्थांत मीठही अल्प लागायचे. पू. आजी माझ्या आईला सांगत असत, ‘‘तू माझ्यासाठी केलेली भाजी खात जा. आश्रमातून भाजी कशाला मागवून घेतेस ?’’ आईला जेवणात आवड-नावड असल्यामुळे तिला पू. आजींसाठी केलेली भाजी खाणे कठीण जात होते, तरीही तिने पू. आजींनी सांगितलेले ऐकले. तिची जेवणातील आवड-नावड आपोआप न्यून झाली. ‘पू. आजींच्या कृपेने हे कधी घडले ?’, हे आईच्याही लक्षात आले नाही.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

३ आ. पू. आजींच्या कृपेमुळे आईच्या दृष्टीकोनात पालट होणे 

३ आ १. रामनाथी आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत याग होत असतांना आईने ‘पू आजींची सेवा करण्यातच यागाचे फळ मिळेल आणि गुरूंना सोडून आश्रमात कशी जाऊ ?’, असे सांगणे : रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात याग किंवा अन्य एखादा कार्यक्रम असल्यास आईला आश्रमात जावेसे वाटायचे. त्या वेळी ‘आश्रमात जावे कि न जावे’, असा तिच्या मनाचा संघर्ष व्हायचा. पू. आजींनी देहत्याग करण्यापूर्वी अनुमाने एक वर्ष पू आजींना आश्रमात जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांच्याजवळ कुणीतरी एक जण असणे आवश्यक असे. त्या वेळी आई पू. आजींना सोडून कुठेही जायची नाही. तेव्हा आई आम्हाला सांगत असे, ‘‘तुम्हाला कुणाला घरी थांबणे शक्य असेल, तर थांबा, नाहीतर मी त्यांच्याजवळ थांबते. तुम्ही तुमची सेवा पाहून मला सांगा.’’ आईचा याविषयी आग्रह नसायचा. त्यामुळे तिला घरी थांबणे सहजतेने स्वीकारता यायचे. वर्ष २०२४ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत ९ दिवस रामनाथी आश्रमात याग होते. तेव्हा आईला एक-दोन वेळा आश्रमात जायला जमले. त्यातच ती आनंदी होती. ती म्हणाली, ‘‘पू आजींची सेवा करण्यातच मला यागाचे फळ मिळेल. माझ्या गुरूंना (पू आजींना) एकटी सोडून मी कशी जाऊ ?’’ तिचे बोलणे ऐकून मला पू. आजींच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्यांच्या कृपेमुळे आईच्या दृष्टीकोनात पालट झाला होता.

४. आईने एक मास पू. आजींची दिवस-रात्र भावपूर्ण सेवा करणे

पू. आजींनी देहत्याग करण्यापूर्वी अनुमाने एक मास पू. आजींची पुष्कळ सेवा करावी लागत असे. त्यांची प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे त्यांना दिवसभरात कधीही झोप लागायची. त्या दिवसा झोपल्यामुळे त्यांना रात्री झोप लागत नसे. त्यांच्या शरिरात त्राण नसल्याने त्यांच्या शरिरात पुष्कळ वेदना होत असत. त्यामुळे त्या आईला सतत हाक मारत असत. या दिवसांत माझ्या आईने पू. आजींची दिवस-रात्र सेवा केली. आईने याविषयी कधीही गार्‍हाणे केले नाही. मी आईला सांगत असे, ‘‘तू सौ. उर्मिला आणि सौ. रोहिणी (आईच्या सुना) यांचे काही वेळ साहाय्य घे.’’ तेव्हा आई म्हणायची, ‘‘या दोघी मुली दिवसभर आश्रमात सेवा करून घरी येतात. त्या थकलेल्या असतात. त्यामुळे मी त्यांना अधिक सांगत नाही. प.पू. गुरुदेव मला शक्ती देतात. त्यामुळे मी सेवा करू शकते.’’

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

आईने पू. आजींची पूर्णवेळ सेवा केल्यामुळे आम्ही आश्रमात पूर्णवेळ सेवा करू शकलो. आम्ही सर्व जण पू. आजी आणि आई यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.

‘प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आपल्या कृपेमुळे पू. लोखंडेआजींची सेवा करण्याचे भाग्य आम्हा कुटुंबियांना मिळाले आणि त्यातून आपण आम्हा सर्वांची साधना करून घेतली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. वाल्मिक भुकन, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२१.१२.२०२४)