प्रयागराज कुंभपर्व २०२५
भाविकांचे आरोग्य धोक्यात, तर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री ठिकठिकाणी उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत; मात्र यातूंन खाद्यपदार्थांची उघड्यावरच सर्रासपणे विक्री केली जात आहे. कुंभक्षेत्री प्राधान्याने चहा, पाव-वडा, भजी, पुरी-भाजी आणि समोसा यांची विक्री केली जात आहे; मात्र अनेक उपाहारगृहांतून अनेक वेळा काळवंडलेल्या तेलातून पदार्थ शिजवले जात आहेत. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे लक्षात येत आहे.

महाकुंभक्षेत्री परवानाधारक उपाहारगृहे आणि दुकाने यांच्यासमवेतच विनापरवानाधारक दुकानेही थाटण्यात आली आहेत. या दुकानांतून विक्री केलेल्या पदार्थांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून कोणतीही पडताळणी केली जात नाही. त्यामुळे बर्याच ठिकाणी तेलकट, कच्चे, अर्धवट शिजवलेल्या पदार्थांची विक्री केली जात आहे. पदार्थ शिजवल्यानंतर त्यावर माशा बसू नये म्हणून नियमाप्रमाणे पातळ जाळी ठेवणे आवश्यक आहे. तथापि दुकानदारांकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.