रत्नागिरी – तालुक्यातील कोतवडे येथील श्री साई मंदिरात भावपूर्ण सेवा करणारे श्री. शरद शांताराम वारेकर (वय ७३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु सत्यवान कदम यांनी ३० जानेवारी २०२५ या दिवशी या साई मंदिरात केली. श्री. वारेकर यांचा सत्कार सद़्गुरु सत्यवान कदम यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन केला. या वेळी श्री. वारेकर यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक उपस्थित होते.
सत्कारानंतर मनोगत व्यक्त करतांना श्री. शरद वारेकर म्हणाले की, साई मंदिरात उत्सव चालू झाला आहे. आजचा कार्यक्रम हे साईबाबांचेच नियोजन आहे. सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु (प.पू. अनंतानंद साईश) हे साईबाबा यांच्याच परंपरेतील आहेत. आज गुरुवार असल्याने तुम्हाला बोलवावे, असे वाटत होते; मात्र बाबांनीच तुम्हाला येथे पाठवले. तुम्हाला आमचे सर्व सहकार्य आहे. आतापर्यंत साईबाबांनी सेवा करून घेतली. आध्यात्मिक पातळी वाढेल, असे काही ध्यानात नव्हते. केवळ सेवा करणे हाच भाव होता. सर्व गुरुदेव करून घेतात. गुरुदेवांना सर्वच कळते. आज मी पुष्कळ तृप्त झालो. साईबाबांनी जीवनाचे सार्थक केले. देवाने आज मला मुक्त केले.
श्री. शरद वारेकर यांचा साईबाबांप्रती असलेला भाव !

श्री. शरद वारेकर साईबाबांशी बोलतात. बाबा सर्वकाही करून घेतात, असा त्यांचा भाव आहे. ते बाबांना प्रत्येक पदार्थ भरवतात आणि तो प्रसाद म्हणून सर्वांना देतात. त्यांना शिर्डी येथून साईबाबांचा प्रसाद आणि हार येतो. तो प्रसाद ते येथील ठराविक लोकांना देतात. प्रतिवर्षी साईमंदिरातील उत्सवाला कुणीतरी संत येऊन जातात. एका वर्षी ११ संत आले होते. शंकराचार्यही येथे एक दिवस राहून गेले आहेत. देवीदेवता येथे दर्शन घ्यायला येतात. त्यांनी येथील प्रत्येक गोष्ट संग्रही ठेवली आहे. त्यांनी ग्रामदेवता महालक्ष्मीदेवीच्या मंदिराची माती संग्रही ठेवली आहे; कारण आता लादी बसली असल्याने माती मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी ती माती संग्रही ठेवली आहे. वर्ष १९९८ पासून ते साई मंदिरातील उत्सव करतात प्रत्येक वर्षी त्यांना वेगवेगळा अनुभव येतो. एका वर्षी त्यांचा साईबाबांच्या ग्रंथ लिहायचा होता. त्यांच्याकडे प्रत्यक्ष दत्त महाराजांची बोलणारे संत आले आणि त्यांनी ग्रंथ लिहिला.
सौ. शरयु शरद वारेकर – त्यांनी आता मिळालेल्या याच मार्गाने सेवा चालू ठेवावी. व्यवहारात अडकू नये.
श्री. भार्गव वझे – वारेकरकाकांचा भाव प्रचंड आहे. प्रत्यक्ष देवीदेवतांचे अस्तित्व त्यांना जाणवते.
श्री. सहस्रबुद्धे – वारेकरकाका लहानपणापासून मित्र आहेत. त्यांची भक्ती वेगळीच आहे. या वयात ते न थकता सर्व काही करतात.
सौ. समृद्धी सनगरे – माझ्या साधनेचा प्रारंभ या मंदिरापासूनच झाला. इथे आल्यावर शिर्डीला गेल्यासारखे वाटते.
सौ. मीनल खेर – प्रवचनासाठी मंदिरात गेले होते. त्या वेळी श्री. वारेकरकाकांना नमस्कार केला, तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘नमस्कार नको, हे कार्य आपणच करायचे आहे.’’
(श्री. वारेकर यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)