
प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – अगदी काही दिवसांपूर्वी किन्नर आखाड्याद्वारे महामंडलेश्वर पद मिळालेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना या आखाड्याचे संस्थापक ऋषि अजयदास यांनी पदावरून हटवल्याचे वृत्त आहे. ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावर बसवणार्या किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद दिल्यामुळे स्वामी आनंद स्वरूप यांच्यासह काही संतांनी टीका केली होती. आखाड्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे आखाड्याने कारवाई केल्याचे समजते. आता आखाड्याची पुनर्ररचना करण्यात येणार असल्याचे समजते.
ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवण्यामागे अनेक कारणे असल्याचे समजते. यामध्ये त्यांनी आधी संन्यास न घेणे, त्यांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत अर्धनग्न चित्रीकरण करणे, त्यांचे गुन्हे विश्वाशी संबंध असणे, तसेच त्या महिला असूनही त्यांनी किन्नर आखाड्यातून ही पदवी देण्यावरही आक्षेप होता. आखाड्यात त्यांच्या या पदाला अंतर्गत विरोधही होता.