अधिक संख्येत वाटलेली पुस्तके लोकांनी रस्त्यावर फेकली

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – सेक्टर क्रमांक ७ येथे उत्तरप्रदेश सरकारने ‘जल जीवन मिशन’ हा एक मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी शासनाकडून उत्तरप्रदेशाच्या जल योजनांची माहिती देणारी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चांगल्या बांधणीची पुस्तके विनामूल्य वितरित केली जात आहेत. ही पुस्तके रस्तावर ये-जा करणार्या भाविकांना १ नव्हे, तर ३-४ एवढ्या संख्येत दिली जात आहेत; मात्र काही लोकांकडून ही पुस्तके काही अंतरावर रस्त्यावरच टाकून दिल्याचे आढळले. काही पुस्तके कचरापेटीजवळ, काही शेजारी उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या टपावर ही पुस्तके सोडून देण्यात येत आहेत. रस्त्यावर पुस्तकांची खोकीच्या खोकी उभी करून ही पुस्तके वितरित केली जात असून भाविक पुस्तके तेथल्या तेथे फाडून काही जण त्यांचा खाण्यासाठी, काही जण जळणासाठी उपयोग करत आहेत. प्रशासनाने पुष्कळ व्यय करून केलेल्या या पुस्तकांचे योग्य व्यक्तींना वितरण करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रशासनाने केलेला ‘जल जीवन मिशन’च्या पुस्तकांचा खर्च पाण्यात जाणार, अशी चर्चा आहे.