भारताचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल !
(एआय चॅटबॉट किंवा एआय चॅट म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची संगणकीय प्रणाली. उदा. चॅट जीपीटी, जेमिनी आदी.)

नवी देहली – भारत पुढील १० महिन्यांत स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय. – कृत्रिम बुद्धीमत्ता) चॅटबॉट सिद्ध करेल, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. वैष्णव पुढे म्हणाले की, एआयसाठी संगणकीय पायाभूत सुविधा सर्वांत महत्त्वाची आहे. भारताने यासंदर्भात १० सहस्र जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) क्षमतेचे लक्ष्य गाठले आहे. ते आता १८ सहस्र ६०० जीपीयूपर्यंत वाढवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे भाषा मॉडेल सिद्ध करण्यासाठी खूप प्रगत जीपीयूची आवश्यकता असते. चीनच्या डीपसीक एआय चॅटबॉट ‘आर्-१’ने २० सहस्र जीपीयू क्षमतेचा वापर केला, तर अमेरिकी एआय आस्थापन ‘ओपन एआय’च्या ‘चॅट जीपीटी’साठी २५ सहस्र जीपीयूची क्षमता वापरली जाते. भारतात सध्या १५ सहस्र जीपीयू क्षमता आहे. आम्ही १८ सहस्र जीपीयूसह एक सामायिक संगणन सुविधा प्रारंभ केली आहे. या मोहिमेवर भारत १० सहस्र ७५० कोटी रुपये खर्च करत आहे. या चॅटबॉटमध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये उत्तरे आणि मजकूर असेल. रिलायन्स, टाटा कम्युनिकेशन, नेक्स्टजेन डेटा सेंटर आणि नोट्टा ही विकासक आस्थापने हे सिद्ध करत आहेत.