लग्नानंतर पत्नीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे ही क्रूरता ! – Madras High Court

मुसलमान पतीने हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केल्याचे प्रकरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्नई – मद्रास उच्च न्यायालयाने एका मुसलमान पतीने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेशी संबंधित एक महत्त्वाचा निकाल देतांना म्हटले आहे की, जर आंतरधर्मीय विवाहात पती किंवा पत्नीला दुसरा धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात असेल, तर ती क्रूरता मानली जाईल. न्यायालयाने म्हटले आहे की, असे करणे राज्यघटनेच्या कलम २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा अधिकार) आणि कलम २५ (धर्माचा अधिकार) यांच्या विरोधात आहे. (जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य यांचे काहीच महत्त्व नसते. तो केवळ ‘लव्ह जिहाद’ असतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)

१. न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मावर विश्‍वास ठेवण्याचे आणि त्याचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले नाही, तर त्याचा त्याच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होतो आणि त्याचे जीवन निर्जीव होते. लग्नाच्या नावाखाली एखाद्याला धर्म पालटण्यास भाग पाडणे, हे विवाहाचा पायाच कमकुवत करते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

२. मुसलमान आरोपीच्या हिंदु पत्नीने क्रूरता आणि परित्याग या दोन कारणांमुळे घटस्फोट मागितला होता. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने हिंदु पत्नीसोबतचे लग्न रद्द करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला आरोपी मुसलमान पतीने मद्रास उच्च न्यायालयात  आव्हान दिले होते. पत्नीने आरोप केला होता की, तिचा पती तिला सतत इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडत होता आणि ती हिंदु असल्याने तिच्या जातीच्या आधारे तिचा अपमान करत होता.

३. उच्च न्यायालयाला निकालात म्हटले आहे की, मुसलमान पतीने पत्नीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला, तिचे नाव पालटले आणि तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले.

४. न्यायालयाने म्हटले आहे की, पतीच्या वागण्यामुळे पत्नीला गंभीर मानसिक त्रास झाला, तिचा विश्‍वास आणि विवेक दुखावला गेला.

५. न्यायालयाने क्रूरता आणि त्याग यांच्या आधारावर घटस्फोटाला अनुमती देतांना म्हटले की, एखाद्याला त्याच्या संमतीविना धर्मांतर करण्यास भाग पाडणे हे हिंसाचार करण्यासारखेच आहे.