ठाणे येथे १६ बांगलादेशी कह्यात !
ठाणे – ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणी ९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका :
• बांगलादेशींचा वाढता सुळसुळाट देशासाठी घातक असल्यामुळे वेळीच यावर उपाययोजना काढणे आवश्यक !
• पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांवर काय कारवाई झाली, ते जनतेला समजले पाहिजे !
घंटागाडीने चिरडल्याने वृद्धाचा मृत्यू !
ठाणे – कचरा टाकण्यासाठी आलेल्या वृद्धाला पालिकेच्या घंटागाडीने चिरडले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. घायाळ अवस्थेत वृद्धाला रुग्णालयात नेल्यानंतर आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले.
रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
पालघर – सफाळे येथील इयत्ता दहावीत शिकणारी वैष्णवी रावल (वय १५ वर्षे) हिचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तिने इयरफोन घातल्याने तिला गाडीचा भोंगा ऐकू आला नाही.
राज्यात थंडी वाढली
मुंबई – राज्यात थंडीचा कडाका वाढला असून राज्यातील तापमानात घट झाली आहे. पुढील २-३ दिवस तापमानात घट रहाणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धुळे येथे या आठवड्यात ९ से.पर्यंत, तर निफाड येथे ११ से.पर्यंत तापमान न्यून झाले होते.
पुरंदर तालुक्यात कांद्यावर ढगाळ हवामानामुळे कीड
पुणे – पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी धुके पडत असल्याने कांदा उत्पादनावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादन अल्प होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याच्या पिकावर करपा, मावा आदी रोग पडत आहेत. कांद्याची पातही पिवळी पडली आणि शेंडे जळल्याप्रमाणे झाले आहेत. रोग आटोक्यात आणण्यासाठी औषधांची फवारणी करत आहेत; परंतु रोगामुळे पिकांची हानी होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अल्पवयीन युवकाची दगडाने ठेचून हत्या !
अमरावती – अनैसर्गिक कृत्य करून अल्पवयीन युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिनेश उपाख्य गोलू उईके (वय २० वर्षे) याला अटक केली आहे.