दक्षिण भारतातून १५० वर्षांनी श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचा कुंभमेळ्यात सहभाग !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांची भेट !

शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांचा सन्मान करतांना योगी आदित्यनाथ

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २५ जानेवारी (वार्ता.) – दक्षिण भारतातून तब्बल १५० वर्षांनी श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य यांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतला आहे. शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महाकुंभमेक्षेत्री आले आहेत. यापूर्वी श्री श्री विधुशेखर भारती यांच्या गुरूंचे गुरु कुंभमेळ्यात आले होते. त्यानंतर एवढ्या कालावधीनंतर दक्षिण भारतातून शंकराचार्यांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतल्याने या मंगल घटनेला वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे.

शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांच्या आगमनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभक्षेत्री त्यांच्या आश्रमात येऊन शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांची भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला. ‘श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांच्या आगमनामुळे महाकुंभाला पूर्णत्व प्राप्त झाले. यामुळे महाकुंभाची शोभा आणखी वाढेल’, अशी भावना या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.

शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांनीही श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शंकराचार्यांना महाकुंभाची व्यवस्था, त्यातील संतांचे योगदान यांसह जगातील विविध देशांतून महाकुंभामध्ये येणारे भाविक यांविषयीची माहिती दिली. या मंगलप्रसंगी श्री श्री विधुशेखर भारती यांनी महाकुंभमेळ्यातील व्यवस्थेविषयी प्रशंसा करत योगी आदित्यनाथ यांना आशीर्वाद दिला. शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती मौनी अमावास्येपर्यंत महाकुंभक्षेत्री असणार आहेत.