‘ऋषि-मुनी आणि तपस्वी यांच्या साधनेमुळे भारत हे राष्ट्र विश्वगुरु झाले आणि भौतिक दृष्टीनेही परम ऐश्वर्यशाली झाले. अशा श्रेष्ठ राष्ट्राची निर्मिती करणार्या सर्व ऋषि-मुनींना आमचा सादर नमस्कार ! आम्ही आपल्या पुरुषार्थाने ऋषि-मुनींच्या तपामुळे निर्माण झालेल्या या शक्तीशाली पराक्रमी सनातन राष्ट्राचे बाह्यतः सैनिकी आणि आंतरिक, तसेच अपसंस्कृती यांच्या आक्रमणांपासून रक्षण करून त्याला पुन्हा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान केले पाहिजे. आमच्या पूर्वजांनी त्या परंपरेतील कायमस्वरूपी वानप्रस्थाश्रमाची कल्पना केली. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन गावे, वने, पर्वत आणि गुहा येथे जाऊन आपले ज्ञान अन् अनुभव इतरांना सांगू शकेल.
समाजाला जेवढी कायदा, पोलीस आणि प्रशासन यांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा अधिक जे ज्ञानप्रकाशाचा प्रसार करू शकतील, अशा आत्मज्ञानी, संतुष्ट विद्वानांची आवश्यकता आहे. कायदे किंवा पोलीस हे लोकांमध्ये सद्भाव स्थापन करू शकत नाहीत; कारण गुन्हेगारामध्ये शिक्षेचे भय उत्पन्न करून त्याला योग्य मार्गावर आणणे, हा नकारात्मक विचार आहे, तर शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कार प्रदान करून सद्मार्गावरून चालण्यासाठी सक्षम बनवणे हा खरा स्थायी मार्ग आहे. त्याचमुळे आमच्या देशात सनातन काळापासून विद्वानाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. शासक (दंडाधिकारी) सुद्धा विद्वानाचा आदर करतो. गीतेमध्येही श्रीकृष्णाने ज्ञानालाच सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. ‘राजास्नातकयोश्चैव स्नातको नृपमानभाक् ।’ (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १३९) म्हणजे ‘राजा आणि विद्वान एकत्र येतील, तेव्हा राजाने विद्वानाचा मान ठेवावा.’
– डॉ. श्रीलाल, संपादक, गीता स्वाध्याय
(साभार : ‘गीता स्वाध्याय’, वर्ष १२, अंक १०, जानेवारी २०२२)