हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त व्हावीत, ही सर्व संतांची मागणी ! – आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज

कुंभक्षेत्री पार पडली विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक

डावीकडून विश्‍व हिंदु परिषदेचे महामंत्री श्री. बजरंगलाल बांगडा, बोलतांना आचार्य महामंडलेश्‍वर अवधेशानंद गिरिजी महाराज आणि विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आलोक शर्मा

प्रयागराज, २४ जानेवारी (वार्ता.) – केवळ अयोध्येतील श्रीराम मंदिरच नव्हे, तर काशी आणि मथुरा येथील मंदिरांवरही हिंदूंचा अधिकार आहे. भारतातील अनेक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळी खोदकाम झाले आहे, तेथे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आढळला आहे. त्यामुळे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’द्वारे ज्या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण झाले आहे, ती मुक्त व्हायला हवीत. ही सर्व संतांचीही मागणी आहे, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांनी येथे केले. विश्‍व हिंदु परिषदेच्या आज झालेल्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अलोक शर्मा आणि महामंत्री श्री. बजरंगलाल बांगडा हे उपस्थित होते.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत !

मंदिरांच्या सरकारीकरणाविषयी आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरीजी म्हणाले, ‘‘हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने ती कह्यात घेतली; मात्र सरकार अधिक काळासाठी मठ आणि मंदिरे कह्यात घेऊ शकत नाही. मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत, यासाठी आम्ही राज्य सरकारशी चर्चा करत आहोत. हिंदूंच्या मंदिरातून प्रतिवर्षी १८६ सहस्र कोटी रुपये सरकारच्या कह्यात जात आहेत. त्यातून सरकारी अधिकार्‍यांचे वेतन आणि अन्य व्यय होत आहे. हे धन हिंदूंचे आहे. येत्या काळात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषद आंदोलन उभारणार आहे.’’

वक्फ कायदा रहित करावा !

वक्फ बोर्डाविषयी अवधेशानंद गिरिजी म्हणाले, ‘‘वक्फ मंडळ मूळात अवैध आहे. ‘राष्ट्रीय मुस्लिम मंचा’नेही या कायद्याला विरोध दर्शवला आहे. भारतात दोन प्रकारचे लोक रहातात. एक हिंदू आणि दुसरे ज्यांचे पूर्वज हिंदू होते, असे लोक. मुसलमान मूळचे हिंदूच आहेत. त्यामुळे वक्फ कायदा रहित करावा, अशी आमची मागणी आहे.’’