सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी – ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव पाळणारे होते’, असा खोटा इतिहास पसरवला जातो. वैचारिक भेद केला जातो. एकदा एका कार्यक्रमात ‘महाराजांच्या सैन्यात अमुक टक्के मुस्लीम मावळे होते. त्यामुळे रायगडावर धार्मिक स्थळ बांधले’, असे सांगितले जात होते. मी त्यांना म्हटले, ‘‘ते महादेवाचे मंदिर आहे. दुसर्या धर्माचे स्थळ नाही. तुम्ही जाऊन पहा.’’ खोट्या माहितीवर आधारित बोलणे योग्य नाही. मग आपल्याला महाराजांचे भक्त म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार नाही. आज आपण खरा इतिहास गांभीर्याने अभ्यासला पाहिजे.
भूतकाळातील चुका पुन्हा घडता कामा नयेत, असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथे काढले.
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हितवर्धन करणे, समाजाचे क्षात्रतेज आणि संस्कृती जपणे, समाजाला विद्यार्जन, व्यवसाय, उद्योग यांकडे वळवणे आणि मराठा समाजाला संघटित करणे, या उद्देशाने ‘अखिल मराठा फेडरेशन’ प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची महासंमेलने भरवणार आहे. त्या अंतर्गत या फेडरेशनचे २ दिवसांचे महासंमेलन विवेक हॉटेल येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी उद्घाटन, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनाच्या सांगता सोहळ्यात बोलतांना रघुजीराजे आंग्रे पुढे म्हणाले, ‘‘समुद्रमार्गे कसाब आणि आतंकवादी घुसले. त्यांना मारण्यासाठी आपले पोलीस २ दिवस झुंजत होते. मग ‘आपण आतंकवादाच्या विरुद्धची लढाई जिंकलो’, असे समजायचे का? आजही किनारी सुरक्षा देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अज्ञात चेहर्यांना बळ दिले, आत्मविश्वास दिला. त्यानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले.’’
‘शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र’, असे म्हटले जाते; मग छत्रपती शिवाजी महाराज उसने आले होते का ? छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नररत्न आपल्याला या भूमीने दिले. त्यामुळे महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्याही नावावर केला जाऊ शकत नाही. या भूमीच्या ऋणातून उतराई व्हायचे असेल, तर आपल्या सर्वांना स्वत:च्या कर्तव्यपदावर सतत एकनिष्ठेने कार्यरत रहावे लागेल’, असे रघुजीराजे आंग्रे यांनी या वेळी सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळा
या वेळी ‘अखिल मराठा फेडरेशन’चे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांना ‘कोकणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यासह ‘जीवन गौरव’, ‘दि ग्रेट मराठा पुरस्कार’, ‘अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार’ आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या महासंमेलनाच्या सिद्धतेसाठी रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ यांच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.