स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

१२ जानेवारी या दिवशी ‘स्वामी विवेकानंद यांची १६२ वी जयंती झाली’, त्या निमित्ताने…

भारतातील बंगाल प्रांतात स्वामी विवेकानंद यांच्या रूपात एक तेजस्वी संन्याशी जन्माला आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता. दक्षिणेश्वरला वास्तव्य करणारे रामकृष्ण परमहंस मात्र नरेंद्राची प्रतीक्षा करत होते. ज्याने ‘आपल्या गुरूंना कधीही पाहिले नाही, आपले गुरु कोण हेही ज्याला नीट माहिती नाही’, असा नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता; पण रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या ज्ञानचक्षुंनी आपल्या शिष्याला पाहिले होते. लौकिक अर्थाने कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेले रामकृष्ण परमहंस मात्र साक्षात्कारी असल्यामुळे गुरूंचे गुरु होते. अशा गुरूंचा आंग्ल विद्याविभूषित शिष्य नरेंद्र आध्यात्मिक विद्या आत्मसात् करण्यासाठी व्याकुळ झाला होता. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व प्राप्त झाल्यावर नरेंद्र आध्यात्मिक ज्ञानाने परिपक्व झाला. ११ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेशाभिमानावरून दांभिकतेने विचारणा करणार्‍या व्यक्तीला त्यांनी दिलेले परखड उत्तर’, याविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/872504.html

स्वामी विवेकानंद

२. ‘ब्राह्मो समाजा’चे प्रतापचंद्र मुजुमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी पसरवलेला अपसमज आणि त्याचा झालेला परिणाम 

माणूस हा विविध प्रकारच्या विकारांनी गांजलेला आहे. विकारांवर मात करून विवेकाचा आश्रय घेणे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मत्सर हा अनेक विकारांपैकी एक विकार आहे. या विकारापासून प्रत्येकाने स्वतःला वाचवले पाहिजे. असे संस्कार करणारी हिंदु संस्कृती आहे. आपल्या मनात मत्सर कधी प्रवेश करतो, हे आपलेच आपल्याला कळत नाही. हा मत्सर आपल्या नकळत आपला सर्वनाश करतो. म्हणूनच माणसाने सावध राहिले पाहिजे.

‘ब्राह्मो समाजा’तील प्रतापचंद्र मुजुमदार हे एक थोर नेते होते. केशवचंद्र सेन यांचे ते जवळचे सहकारी होते. केशवचंद्र सेन यांच्यासह रामकृष्ण परमहंस यांच्याकडे ते अनेक वेळा गेले होते. रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक अधिकाराचा परिचय करून देणारा लेख प्रतापचंद्र मुजुमदार यांनी लिहिला होता. विद्यार्थी दशेत असतांना नरेंद्र ब्राह्मो समाजामध्ये जात होता. त्यामुळे प्रतापचंद्र मुजुमदार नरेंद्राला ओळखत होते. ज्याला आपण ओळखतो, असा एक तरुण सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोला आला, हे जेव्हा प्रतापचंद्र मुजुमदार यांना कळले, तेव्हा त्यांना आनंद झाला.

श्री. दुर्गेश परुळकर

स्वामी विवेकानंद यांचे पहिले भाषण सर्वधर्म परिषदेत प्रचंड गाजले. या पहिल्याच भाषणाने त्यांनी संपूर्ण सभा जिंकली. त्यांचे नाव सर्वांच्या मुखातून ऐकल्यामुळे प्रतापचंद्र मुजुमदार यांची त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी पालटली. त्यामुळे प्रतापचंद्र मुजुमदार यांच्या मनात स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मत्सर निर्माण झाला. अल्पकाळातच मत्सराने विराट रूप धारण केले. मुजुमदारांनी सर्वधर्म परिषदेच्या मिशनर्‍यांपाशी स्वामी विवेकानंद यांची मनसोक्त निंदा केली. त्यांच्याविषयी अत्यंत चलाखीने अपसमज पसरवला आणि त्यांचे मन कलुषित केले. एवढेच नाही, तर त्यांनी स्वामी विवेकानंद यांना ओळख दाखवणेही सोडून दिले. स्वतःच्या पुस्तकातून, पत्रकामधून स्वामी विवेकानंद यांच्या विरुद्ध लिहून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराने स्वामी विवेकानंद दुःखी कष्टी झाले नाहीत कि मनाने खचून गेले नाहीत. त्यांची त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यावर नितांत श्रद्धा होती. ‘गुरुदेव आपल्या पाठीशी असल्यामुळे कुणीही आपले अहित करू शकणार नाही’, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे या प्रकाराचा त्यांच्या मन-बुद्धीवर कोणताही परिणाम झाला नाही. मुजुमदारांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जो अपसमज पसरवला होता, त्याला अमेरिकेतील काही पत्रकार फसले. त्यांनी प्रतापचंद्र मुजुमदार यांची प्रसिद्धी करण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला.  स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची त्या पत्रकारांनी नोंदही घेतली नाही. अमेरिकेतील मिशनर्‍यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विरोधात काही काळ एक पद्धतशीर मोहीम उघडली. त्यांच्या या प्रयत्नाला हिंदुस्थानातील ‘थिऑसॉफिस्ट’ (ब्रह्मज्ञानी) आणि ब्राह्मो समाजी यांचा हातभार लागला. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.

असे असले, तरी स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्यानाचा विचारांचा प्रभाव अनेक लोकांवर जो पडायचा होता, तसा तो पडला. कुणालाही तो रोखता आला नाही. ‘स्वामी विवेकानंद यांच्यासारखा ज्ञानी आणि अधिकारी पुरुष ज्या देशात आहे, अशा देशात आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी मिशनरी पाठवावेत हा मूर्खपणा आहे’, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील नागरिकांकडून सहजतेने होऊ लागली. त्याचा परिणाम असा झाला की, मिशनर्‍यांच्या आशिया खंडातील धर्मप्रचाराच्या कामासाठी अमेरिकेतून गोळा होणार्‍या देणग्यांची रक्कम स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्यानानंतर एका वर्षाच्या आत १० लाख डॉलरने न्यून झाली.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (६.१.२०२५)  (क्रमशः)