संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित ! – मुख्यमंत्री

आळंदी (पुणे) येथील ‘संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमा’त मुख्यमंत्र्यांची उपस्थिती !

पुणे – भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित राहिली आहे. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटवल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीक्षेत्र आळंदी येथे ‘वेदश्री तपोवन परिसरा’त आयोजित करण्यात आलेल्या ‘संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमा’त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकार यांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यावरणीय आणि वातावरणीय पालट, पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, ह.भ.प. ब्रह्मगिरी मारोति महाराज कुसेकर, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान’चे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे संस्थान’ सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. मारुति महाराज कुरेकर आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, गोमातेची सेवा हे केवळ धर्मकार्य नसून राष्ट्रकार्य आहे. गोसेवा आणि नदी स्वच्छतेसाठी शासन कटीबद्ध आहे. शेतीतील अडचणी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्त्व वाढले पाहिजे. ज्या प्रकारे गंगानदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा स्वच्छ वहाणार्‍या नद्या बनवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जातील. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.