माझिया मराठीचे नगरी…
मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत पाठोपाठ क्रमांक एकची सात्त्विक भाषा असणार्या ‘मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो ?’, याचे विचारमंथन या मालिकेतून करण्याचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने ‘शासन मराठी भाषेच्या विकासासाठी काय काय करत आहे ?’, त्याची तोंडओळख मागील काही लेखांमधून आपण करून घेत आहोत. यामध्ये आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणार्या शासनाच्या विविध संस्थांचे कार्य थोडक्यात समजून घेत आहोत. ७ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ या संस्थेचे कार्य थोडक्यात पाहिले. आज याचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग २)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861014.html

७. मराठी विश्वकोशाचे महत्त्व
वर्ष १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पुढे ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ उदयास आलेे.
मराठीत विविध विषयांवरील कोशवाङ्मय आहे. त्यात नाट्यकोशापासून फारसी-मराठी शब्दकोशापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण कोश आहेत. भारतीय व्यवहार कोश, संस्कृती कोश, ज्योतिष महाशब्द कोश आदी २० कोश मराठी भाषेत आहेत. मराठी विश्वकोशात मात्र विश्वातील अनेक विषयांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत असल्याने तो एक प्रकारे ज्ञानकोश झाला आहे. त्यामुळे भाषा वृद्धींगत करण्याचे ते एक माध्यम बनले आहे. मराठीतील विश्वकोश मराठीला ज्ञानभाषा बनवण्यात वाटा उचलत आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानव्यवस्थेला एक विशेष स्थान आहे आणि सतत त्यात भर पडत असते. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विश्वातील ज्ञान मराठी भाषेत उपलब्ध झाले, तर मराठी भाषिकांना ते ज्ञात होण्यास लाभ होणार आहे. मराठीत ‘विश्वातील ज्ञानच उपलब्ध नाही’, ही न्यूनता भरून काढण्यास हे विश्वकोश साहाय्य करतात. म्हणून मराठी भाषिक, विद्यार्थी, अभ्यासक, तज्ञ ते संदर्भासाठी वापरू शकतात.
‘डिक्शनरी’त (शब्दकोशात) केवळ शब्दाचा अर्थ असतो. मराठी विश्वकोशात सुबोध आणि सोप्या भाषेत सारांशाने विश्वसनीय अन् दर्जा राखून माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तसेच संबंधित माहितीच्या अनुषंगाने संदर्भग्रंथही दिलेले आहेत. मराठी विश्वकोशाचे खंड आता माहितीजालावर आणि अॅपवर उपलब्ध झाले, तरी भारतीय समाजजीवनाचा विचार करता त्याचे मुद्रितमूल्यही तितकेच आहे.

८. अद्ययावतीकरण
विश्वकोशाचे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतील नवनवीन संशोधनामुळे नवीन माहितीत मोठ्या प्रमाणावर भर पडली असून नव्या संकल्पना, नवीन विचारप्रवाह पुढे आले आहेत. कोशांची निर्मिती होईपर्यंत तंत्रज्ञान अद्ययावत् झालेले असते, भाषेत पालट झालेले असतात, संस्कृतीत पालट झाल्याने भाषेतील शब्दांमध्येही पालट असतो, तसेच काळ पुढे गेल्याने अन्य काही गोष्टींच्या संदर्भातही पालट झालेला असतो. तंत्रज्ञान, शब्द, संस्था, व्यक्ती, पदे, ग्रंथ इत्यादी नवीन आलेले असतात किंवा काळाच्या ओघात ते अस्तित्वात नसतात. त्यामुळे विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी विविध विषयांची स्वतंत्र ६० ज्ञानमंडळे स्थापन करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. ही मूळ संकल्पना प्रथम संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची होती. त्यातील काही ज्ञानमंडळे स्थापन झाली होती. वर्ष २०१५ नंतर मराठी कुलपतींच्या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक आणि संशोधन संस्था, विद्यापिठे यांना यात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. विविध विद्यापिठांतील तज्ञांकडे त्या त्या विषयातील नोंदींची माहिती देण्याचे दायित्व सोपवण्यात आले आहे.
९. दुसर्या आवृत्तीची निर्मिती
सर्व विषय आणि ज्ञान शाखांतील झालेल्या पालटांंची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने पाऊल उचलले. कोश अद्ययावत् करणे, वादग्रस्त सूत्रे टाळणे आणि ते अधिक अचूक करणे या त्रिसूत्रांवर आधारित मराठी विश्वकोशाच्या दुसर्या आवृत्तीचे काम चालू करण्यात येत आहे. त्यासाठी सुधारणांच्या दृष्टीने सूचना पाठवण्याचे आवाहनही शासनाने यापूर्वी केले होते. संकेतस्थळावरील आवृत्तीत ५ सहस्र नोंदी अधिक आहेत. त्यांचाही समावेश दुसर्या मुद्रित आवृत्तीत करण्यात येईल.
१०. निरंतर प्रक्रिया
विश्वकोशासाठी माहिती गोळा करणे, ही अभ्यासपूर्ण आणि वेळ घेणारी प्रक्रिया असल्याने त्याच्या निर्मितीचा कालावधीही अधिक असतो. गेली ५ दशके विश्वकोश निर्मिती मंडळाचे कार्य अविरत चालू आहे. विश्वकोशाचे आतापर्यंत २० खंड प्रकाशित झाले असले, तरी अजून ५ खंड निर्माण करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यामुळे ही एक प्रकारे निरंतर प्रक्रिया होऊन गेली आहे.
यातील माहितीच्या नोंदींचे विषय ठरवणे, त्याची माहिती संबंधित तज्ञांकडून लिहून घेणे, अन्य तज्ञांकडून पडताळून घेणे, परत कोशाच्या संपादकीय मंडळाने पडताळणे आणि संकेतस्थळावर जाण्यापूर्वी मुख्य संपादकांनी पडताळणे या निर्मिती प्रक्रियेच्या पद्धतीमुळे मराठी विश्वकोश प्रादेशिक असला, तरी दर्जा आंतरराष्ट्रीय झाला असल्याचे म्हटले जाते. विश्वकोशाच्या निर्मिती प्रक्रियेला वेळ लागला, तरी १८ सहस्र १६३ हून अधिक नोंदी असणार्या विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणामुळे पुढच्या पिढीकडे पुढचे अद्ययावत् ज्ञान जात रहाणार आहे.
११. ‘कुमार विश्वकोशा’ची निर्मिती
मराठी विश्वकोशासमवेत मुलांसाठी कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजनाही अनेक वर्षे विचाराधीन होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ही योजना सिद्ध केली होती. त्यांच्या नंतरच्या अध्यक्षांच्या काळात टप्याटप्याने ही योजना साकार होत गेली. ९ वी ते १२ वी या इयत्तांचे, म्हणजे सर्वसाधारणपणे १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थी हा कुमार विश्वकोशाचा वाचकवर्ग अभिप्रेत आहे. या विश्वकोशाचा खंड १ ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. ‘भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ‘विश्व आणि पृथ्वी’, ‘प्राचीन संस्कृती’, ‘आधुनिक जग’, ‘उद्योगधंदे आणि व्यापार’, ‘शेती आणि शेतकी’, ‘जागतिक साहित्य’, ‘ललित कला’; ‘क्रीडा, खेळ, मनोरंजन’, ‘थोरांची चरित्रे’, ‘महाराष्ट्र आणि भारत’ हे कुमार विश्वकोशाचे प्रस्तावित खंड आहेत.
कुमार विश्वकोशाप्रमाणेच बालविश्वकोशाच्या निर्मितीची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे.
भारत जागतिक महासत्ता होत असतांना आणि माहिती ज्ञानात क्रांती होत असतांना कोशाचा वापर मराठी भाषिकांना ही माहिती देण्याचे महत्त्वाचे साधन बनेल, यात शंका नाही. भाषेचा अभिमान बाळगत असतांना तो केवळ भावनिक पातळीवर न रहाता, तिला खरोखरच समृद्ध करणे, हेही दायित्व रहाते. मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीला वैश्विकदृष्ट्या ज्ञानात्मक बनवण्यास हातभार लागत आहे. (११.१२.२०२४)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (समाप्त)
‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
पर्यावरण संरक्षणाला निवडणुकीचे सूत्र बनवणे आवश्यक !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !