‘व्हॉट्सअॅप’वर वाल्या कोळी यांच्या पत्नीमुळे ‘रामायण’ हे महाकाव्य होऊ शकले, याविषयीचा प्रसारित झालेला संदेश वाचनात आला. यात म्हटले होते, ‘देवर्षी नारद वाल्या कोळीला तो ज्यांच्यासाठी पापकर्म करतो, त्यांना म्हणजेच त्याची पत्नी, नातेवाईक यांना ‘त्याच्या पापात भागीदार होणार का ?’, ते विचारायला सांगतो. तेव्हा वाल्या कोळ्याची पत्नी स्पष्ट नकार देते. तेव्हा वाल्या कोळीचे डोळे उघडतात. देवर्षी नारद त्याला रामनामाचा जप करण्यास सांगतात. अनेक वर्षे जप करून वाल्या कोळ्याचे वाल्मीकि ऋषि होतात. वाल्या कोळीच्या पत्नीने ‘नाही’ म्हटले; म्हणून संपूर्ण जगाला ‘रामायण’ मिळाले. योग्य वेळी, योग्य ठिकाणी ठामपणे काही गोष्टींना ‘नकार’ देणे हे महत्त्वाचे आहे.
सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. आपला पती भ्रष्टाचार करतो, पैसे खातो, हे बर्यापैकी गृहिणींना ठाऊक असते; पण त्या याविषयी चकार शब्द काढत नाहीत, उलट मूग गिळून गप्प बसतात. आजच्या सुसंस्कृत, तसेच सुशिक्षित प्रत्येक पत्नीने पतीला असे करण्यास वेळीच नकार दिला, तर देशभर बोकाळलेला भ्रष्टाचार निश्चितच न्यून होण्यास साहाय्य होईल. दुर्दैवाने तसे होत नसल्याने ज्याला याविषयी ठाऊक आहे, तो भ्रष्टाचार्याच्या पापात सहभागी होतो. यात केवळ पत्नीच असे नव्हे, तर कुटुंबियांचाही सहभाग असतो. प्रत्येकानेच याचे भान बाळगायला हवे; पण तसे होत नाही. सर्व काही ‘मिटल्या तोंडी’ सर्रास चालू असते. हिंदी भाषेत एक म्हण आहे, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप ।’, हे टाळायला हवे.
मनुष्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. प्रत्येकात ते अधिक-उणे प्रमाणात असतातच. त्यांच्यामुळे मनुष्याची हानी होत असते. हे लक्षात येऊनही प्रत्येक मनुष्य त्यांना आपला देह आणि मन येथे वास्तव्य करू देतो. ते तेथे सुखाने (?) नांदत असतात; पण हानी या जिवाची होते. त्यांना तेथे वास्तव्य करण्यास नकार हा आपणच द्यायला हवा. तसे केल्यास आयुष्यातील अनेक समस्या सहजपणे सुटून जातील. याच्याच जोडीला असंगाशी संग करणे, व्यसनांना कवटाळणे, अयोग्य कृती किंवा अयोग्य विचार करणे यांनाही वेळीच म्हणजे त्याच क्षणी नकार देणे हे मानवाच्या हिताचे आहे. प्रथम नकार देतांना संघर्ष होईलही; पण त्यातून आयुष्याला मिळणारे वळण हे नक्कीच प्रगतीशील असेल, यात शंका नाही.
अयोग्य गोष्टींना योग्य वेळी ‘नकार’ दिल्यास मनुष्याचे व्यक्तीमत्त्व घडते आणि विकसितही होते. मनुष्याची सद़्सद्विवेकबुद्धी जागृत होते. बुद्धीला सामर्थ्य आणि मनाला शुद्धता, निर्मळता अन् सात्त्विकता प्राप्त होते. असा मनुष्य लवकरात लवकर यशोशिखरावर पोचू शकतो. यातूनच आत्मोद्धार साध्य होतो.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी