१. व्यक्तीगत जीवन त्यागमय करण्याचा आदेश हिंदु धर्माने देणे
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. हिंदु धर्माच्या वैशिष्ट्यांचा (हिंदु धर्माची वैशिष्ट्ये याआधीच्या लेखात दिली आहेत.) उपयोग सत्यदर्शन, एकात्मता आणि परमार्थ यांसाठी झाला पाहिजे’, हा हिंदु धर्माचा आग्रह आहे. हिंदु धर्मातील ऋत अर्थात् वैश्विक सत्याची संकल्पना दिव्य आहे. त्यावर आधारित व्यक्तीगत जीवन निःस्वार्थ, तपोमय, त्यागमय, निष्ठामय, श्रद्धामय करण्याचा आदेश हिंदु धर्म देतो. हिंदूंंची तृप्ती लौकिक वा भौतिक विजयाने होत नाही. आध्यात्मिक अनुभूतीच हिंदूंंना सर्वश्रेष्ठ वाटते. कुटुंबसंस्था म्हणजे हिंदु धर्माचे सारसर्वस्व !
२. भारतवर्ष म्हणजे पृथ्वीवरील भगवंताचे देवघर !
अर्थ आणि काम यांनाही हिंदु धर्माने पुरुषार्थ मानले; पण त्यांचे स्थान दुय्यम ठेवले. प्रधान पुरुषार्थ आहेत, ते म्हणजे धर्म आणि मोक्ष ! अन्य देशांत ईश्वर आणि भगवंत यांचे प्रेषित येतात. आपण (भारतीय) असे भाग्यवंत आहोत आणि आपला देश इतका महान आहे की, इथे प्रत्यक्ष भगवंतच अवतरतो. संपूर्ण पृथ्वी हे जर मोठे घर मानले, तर बाकीचे देश, म्हणजे या घरातील मोठी दालने असतील; पण भारतवर्ष म्हणजे या घराचे पावन आणि पवित्र ‘देवघर’ आहे.
३. ‘हिंदुस्थान’ची महती !
भारताला ‘हिंदुस्थान’ही म्हणत असल्यामुळे अतिशय सुंदर श्लोक ‘बार्हस्पत्य संहिते’त आलेला आहे. तो श्लोक असा आहे,
हिमालयं समारभ्य यावत् सिन्धुसरोवरम् ।
तद्देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ॥ – बार्हस्पत्यशास्त्र
अर्थ : हिमालयापासून हिंदमहासागरापर्यंत पसरलेल्या देवनिर्मित देशाला ‘हिंदुस्थान’ असे नाव आहे.
४. ‘धर्म’ शब्दाची व्युत्पत्ती
धर्म शब्द ‘धृ’ या धातूला मन् प्रत्यय लागून सिद्ध झाला आहे. धृ म्हणजे धारण करणे. या धातूपासून ‘धर्म’ शब्द बनला आहे. ‘धर्म’ शब्दाची व्युत्पत्ती ३ प्रकारे होते.
अ. ‘ध्रियते लोकः अनेन इति धर्मः ।’ म्हणजे ‘लोकांची धारणा करणारा, तो धर्म.’
आ. ‘धरति धारयति वा लोकम् इति धर्मः ।’, म्हणजे ‘संसाराला वा लोकांना धारण करणारा, तो धर्म.’
इ. ‘ध्रियते लोकयात्रानिर्वाहार्थं यः स धर्मः ।’, म्हणजे ‘लोकयात्रा निर्वाहार्थ जो सर्वांना धारण करतो, तो धर्म होय.’
ई. ‘धरति लोकान् ध्रियते पुण्यात्मभिः इति वा ।’, म्हणजे ‘जो लोकांना धारण करतो किंवा जो पुण्यात्म्यांकडून धारण केला जातो, तो धर्म होय’, अशी धर्माची व्याख्या आहे. सदाचारी, नीतीसंपन्न आणि लोककल्याणकारी आचरण म्हणजेच धर्म होय !
५. श्रुति-स्मृतीतील धर्म
५ अ. ऋग्वेद : यात धर्म शब्द सुमारे ५६ वेळा आला आहे. काही ठिकाणी नाम, तर काही ठिकाणी तो विशेषण म्हणून आहे. ‘पोषण करणे, नैतिक नियम, आचार किंंवा यज्ञ’, अशा अर्थाने ‘धर्म’ शब्द वेदात उपयोजिलेला आहे.
‘अथा धर्माणि सनता न दूदुषत् ।’ (ऋग्वेद, मण्डल ३, सूक्त ३, ऋचा १) ,म्हणजे ‘हा अग्निदेव प्राचीन धर्माचे पालन करतो.’ ‘तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।’ (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १६४, ऋचा ४३), म्हणजे ‘यज्ञकर्म सर्वाधिक प्राचीन धर्म आहे.’
५ आ. अथर्ववेद : अथर्ववेद म्हणतो, ‘ऋत, सत्य, तप, राष्ट्र, श्रम, धर्म, कर्म, भू, भविष्य, वीर्य, लक्ष्मी आणि बल हे सारे गुण यज्ञीय उच्छिष्ट ब्रह्मात (अर्थात् परमात्म्यात) सामावले आहेत.’ (अथर्ववेद, ११.७.१७)
५ इ. शुक्ल यजुर्वेद : शुक्ल यजुर्वेदाची वाजसनेयी संहिता सांगते (या श्लोकामध्ये यज्ञकुंड आणि यज्ञशाळेच्या ३ मर्यादांविषयी म्हटले आहे की), जगतातील संकट परिहारासाठी (यज्ञार्थ) आम्ही अग्नीची स्तुती करतो. (प्रथम मर्यादा)
१. आपण याजकांचे रक्षण करणारे आहात. विश्वावसु गंधर्व आपले सर्व प्रकारे रक्षण करोत.
२. आपण याजकांचे रक्षक इंद्रदेवाचा उजवा हात आहात.
३. हे यजमानाचे रक्षणकर्ता अग्नि, मित्रावरुण (सूर्य आणि वायू) धर्मपूर्वक, उत्तम रितीने आपल्याला धारण करो.’ (वाजसनेयी संहिता २.३)
५ ई. तैत्तिरीय उपनिषद़् (१.११) : हे उपनिषद ‘सत्यं वद । धर्मं चर ।’ म्हणजे ‘खरे बोल, धर्माचरण कर’, असा आदेश देते.
५ उ. मनुस्मृती : मनुस्मृतीप्रमाणे धर्म शब्दाचा अर्थ ‘वर्णाश्रमविहित कर्म वा कर्तव्य’, असाच आहे (मनुस्मृती १.२)
(क्रमशः)
– विद्यावाचस्पति शंकर वासुदेव अभ्यंकर
(साभार : हिंदु धर्म संस्कृती ग्रंथमाला १, ‘हिंदु धर्माचे स्वरूप’)
लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862630.html