पुणे – अमेरिकेसह अनेक देशांमध्ये इ.व्ही.एम्.वर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) बंदी आहे. मी ४ वेळा इ.व्ही.एम्.द्वारे निवडून आले आहे. माझ्यासह समाजातही इ.व्ही.एम्.विषयी अस्वस्थता आहे. म्हणूनच इ.व्ही.एम्. ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर निवडणुका घ्या, अशी मागणी होत आहे. (लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळाल्यावर तेव्हा इ.व्ही.एम्. ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर निवडणुका घेण्याची मागणी का केली नाही ? स्वत:ला विजय मिळाला, तर आक्षेप नाही आणि पराजय झाल्यावर आक्षेप का ? – संपादक) त्याची नोंद घेऊन निवडणूक आयोगानेही पालट केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मार्केट यार्ड येथील ‘निसर्ग कार्यालया’मध्ये पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्या बोलत होत्या.
खासदार सुळे पुढे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि समाजात एखाद्या प्रक्रियेविषयी शंका असेल, तर ती दुरुस्त व्हायला पाहिजे इतकीच आमची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीतील इ.व्ही.एम्. विषयीचे अनेक पुरावे आम्ही आयोगाला दिले आहेत. बॅलेटवर निवडणूक झाल्यास कोणतीच अडचण येणार नाही.