कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार हे मानवाधिकाराचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात १० डिसेंबरला सकाळी ११ वाजता सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही प्रत्येक ठिकाणी हिंदूंनी असे आंदोलन करावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत करण्यात आले. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, बजरंग दलाचे श्री. राजू गडकरी, श्री. प्रसन्न शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, ‘इस्कॉन’चे श्री. दीपक खोत, श्री. किरण इदाते, केशव विलास दास प्रभुजी यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात शासनाने ठोस कृती केलेली नाही. शासनाने सैनिकी कारवाईसारखी कठोर कृती करणे अपेक्षित आहे. कोल्हापूर शहरातही बांगलादेशी घुसखोर असतील, तर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. १० डिसेंंबर हा ‘मानवाधिकार दिवस’ असून या दिवशी देशभरात आंदोलन होणार आहे. प्रत्येक मंदिरात महाआरती करून बांगलादेशातील हिंदूंसाठी प्रार्थना करण्यात येणारा आहे. आंदोलनात हिंदूने जात, संप्रदाय, पक्ष विसरून एक हिंदू म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.’’
संपादकीय भूमिका :हिंदुत्वाच्या सूत्रावर सत्तेत आलेल्या शासनाच्या काळात तरी आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा ! |