अमेरिकेने बांगलादेशाला सुनावले
वॉशिंग्टन (अमेरिका) – अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे दायित्व आहे, अशा शब्दांत अमेरिकेने बांगलादेशाला सुनावले.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. सरकारने कायद्याच्या राजवटीचा आदर केला पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून त्याने मूलभूत मानवी हक्कांचा आदर केला पाहिजे. त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करत राहू. कोणत्याही प्रकारचा निषेध होऊ शकतो; मात्र तो शांततापूर्ण असला पाहिजे.
एका प्रश्नाला उत्तर देतांना पटेल म्हणाले की, अटकेत असलेल्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांना मानवाधिकारानुसार वागणूक दिली पाहिजे.
हिंदूंच्या हत्यांची चौकशी करावी ! – खासदार ब्रॅड शेरमन
खासदार ब्रॅड शेरमन म्हणाले की, बांगलादेशाच्या अल्पसंख्य हिंदूंचे संरक्षण करणे आणि अलीकडील आक्रमणे अन् छळ यांच्या विरोधात सहस्रो अल्पसंख्य हिंदूंच्या आंदोलनांना अर्थपूर्णपणे संबोधित करणे हे अंतरिम सरकारचे दायित्व आहे.
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पतनापूर्वी आणि नंतर झालेल्या दंगलीच्या काळात झालेल्या हत्या आणि इतर हक्कांचे उल्लंघन यांंची चौकशी करण्याची मागणी ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद’ आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त व्होल्कर टर्क यांनी केली आहे.