१. मृत्यूपत्रातील चुकांमुळे होणारा त्रास
‘मृत्यूपत्र’ याविषयी असे सांगितले जाते की, जेव्हा माणूस बोलायचा बंद होतो, तेव्हा त्याचे मृत्यूपत्र बोलायला लागते. मृत्यूपत्र काय बोलते ? तर त्यामध्ये जे काही लिहिलेले आहे ते वाचून दाखवले जाते. त्यामुळे घाईगडबडीत काही चुका त्यात झाल्या आणि मसुदा सिद्ध करतांना महत्त्वाच्या गोष्टींचा तपशील जर लिहिलाच गेला नाही, तर तेच मृत्यूपत्र चुकीच्या गोष्टी बोलायला लागते; परंतु तोपर्यंत या गोष्टी लक्षात न आल्यामुळे पुष्कळ उशीर झालेला असतो. मृत्यूपत्र लिहिणारा जर जिवंत असेल अन् त्याला जर वेळेत मसुद्यामधील चूक लक्षात आल्या, तर ती चूक वेळेत दुरुस्त करता येईल; परंतु ती जर त्याच्या लक्षात आली नाही, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या वारसदारांना अतोनात त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो; कारण एकदा केलेले मृत्यूपत्र मरणानंतर पालटता येत नाही अन् त्यामुळे संपत्ती विनाकारण अडचणीत येते. संपत्तीची वाटणी नीट होत नाही आणि पुष्कळदा न्यायालयीन हेलपाटे होतात अन् मृत्यूपत्र करणार्याला (‘टेस्टेटर’ला) जशी आणि ज्याला संपत्ती द्यायची होती, त्या मूलभूत संज्ञेलाच तडा जातो अन् नकोसा वाटणारा ‘सक्सेशन ॲक्ट’ (उत्तराधिकार कायदा) लागतो आणि मग कायदेशीर वारसांनाच केवळ त्याची मालकी मिळते.
२. मृत्यूपत्र करण्यामागील उद्देश
येथे मूळ उद्देशालाच तडा जातो; कारण मृत्यूपत्र, म्हणजे मरणार्याच्या इच्छेप्रमाणे संपत्तीचे वाटप त्याच्या मृत्यूनंतर होते. किंबहुना मृत्यूपत्र करणारा व्यक्ती त्याला पाहिजे त्याला, मित्र, मैत्रिणी, गरिब, कामवालीबाई, जुने नोकर, लहानपणीचे; पण सध्या हालाखीत असलेला मित्र किंवा गरजू विद्यार्थ्याला; ज्याला कुणाला साहाय्य करायची इच्छा आहे, त्याला त्याची संपत्ती देऊ शकतो. हा एक प्रकारचा ‘ह्यूमन राईट’ (मानवी हक्क) आपल्याला बहाल केलेला आहे. ही इच्छापूर्ती केवळ मृत्यूपत्र करतांनाच पूर्ण होते. काही जण काही भाग वाटतांना काही नातवंडांना तर काही भाग त्या माणसाच्या गतकाळात अडीअडचणीत असतांना उपयोगी पडलेल्या व्यक्तीला देऊ करते. याला आपण ‘परोपकार’ही म्हणू शकतो. ‘गुरुचरित्रा’मध्ये या अशा पुण्याचा आणि परतफेडीचा तपशील दिलेला आहे. ‘मृत्यूपत्र’ हा एक आध्यात्मिक ऐवज असू शकतो, ज्यामध्ये मागील जन्मांच्या सुकृताची परतफेडीची संधी प्राप्त होते. सबब इच्छापूर्ती हा एकमेव हेतू ‘मृत्यूपत्र’ करणार्याचा असतो; परंतु मृत्यूपत्राच्या मसुद्यामध्ये काही चुका झाल्यास पुढे निस्तरावे लागते.
३. मृत्यूपत्रामध्ये पालट न केल्यास लागू होणारे कायदे आणि नियम
काही मसुद्यामध्ये नावाच्या स्पेलींगमध्ये चुका होतात, आधार कार्ड क्रमांक चुकीचा लिहिला जातो, मालमत्तेचा सर्व्हे क्रमांक जर चुकला, तर पुढे नोंदीसाठी पुष्कळ अडचणी येतात. काही जण केवळ नोटरीकडे जाऊन मृत्यूपत्र करतात आणि घोटाळे होतात. कधी कधी स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या मालमत्तेचा उल्लेख केला जातो आणि पुढे घोटाळे होतात. ज्यांना मालमत्ता देण्याची इच्छा व्यक्त केली असेल, असा व्यक्ती जर आधीच मरण पावला आणि तद्नंतर या मृत्यूपत्रामध्ये पालट (कोडीसिल) न करता मृत्यूपत्र करणार्याचे जर निधन झाले, तर त्या मालमत्तेला ‘भारतीय वारसा कायदा’ लागू होतो. कदाचित् मृत्यूपत्र करणार्याला व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीला संबंधित मालमत्ता द्यायची नसेल अन् त्या नातेवाईकाने मृत्यूपत्र करणार्याला पूर्वआयुष्यात त्रास दिला असेल, तरीही तपशीलाच्या चुकीमुळे त्या संबंधित व्यक्तीला ती मालमत्ता मालकीहक्काने वा वारसाहक्काने जाते.
४. मृत्यूपत्र आणि आध्यात्मिक दृष्टी
आध्यात्मिकदृष्ट्या येथे काही गडबड होऊ शकते. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जर आध्यात्मिक विचारधारेची असेल आणि त्याच्या नावडत्या व्यक्तीला जर ती मालमत्ता जात असेल अन् ती (मृत्यूपत्र करणारी) जिवंत असेपर्यंत त्याची हीच इच्छा असेल की, त्या व्यक्तीला मिळू नये, तर येथे त्याच्या आत्म्याच्या पुढील प्रवासात अडथळे येऊ शकतात. अर्थात् हा प्रत्येक व्यक्तीच्या धारणेचा भाग आहे. त्यामुळे नैतिकदृष्ट्या, विवेकदृष्टीने, भावनिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या व्यवस्थित आणि काटेकोरपणे मृत्यूपत्र करणे पुष्कळ आवश्यक आहे; पण चुका झाल्या, तर त्या अंगाशी येतात.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, फोंडा, कुर्टी, गोवा.