गोव्यातील ‘पैसे घेऊन सरकारी नोकरी’ प्रकरणातील संशयित श्रीधर सतरकर याची आत्महत्या

फोंडा (गोवा), २ नोव्हेंबर (वार्ता.) –  गोवा राज्यात सध्या पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिचा साथीदार श्रीधर कांता सतरकर (केरी, फोंडा, वय ५१ वर्षे) हा ३० ऑक्टोबरपासून पसार होता. कुटुंबियांसह पोलीस त्याच्या शोधात असतांना २ नोव्हेंबर या दिवशी त्याचा मृतदेह कुंकळ्ये, म्हार्दाेळ येथील रस्त्याच्या बाजूला जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. म्हार्दाेळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

श्रीधर सतरकर हा सरकारी कर्मचारी असून पैसे घेऊन नोकर्‍या देण्याच्या प्रकरणामध्ये त्याचे नाव समोर आल्यानंतर म्हार्दाेळ पोलिसांनी त्याचे यापूर्वी २ वेळा अन्वेषण केले आहे. श्रीधर सतरकर याच्याकडे पोलिसांना दुचाकी सापडली असून ती संशयित पूजा नाईक हिच्या नावावर असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी नोकरी विक्री प्रकरणी सहभागी असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यापासून श्रीधर सतरकर हे मानसिक दबावाखाली असल्याचे समजते. नोकरी विक्रीच्या प्रकरणी सतरकर यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले, ते सर्व जण त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि १ मुलगी, असा परिवार आहे.