थायलंडमध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपति मंदिर !
पुणे – थायलंडमधील फुकेत येथे आता हुबेहुब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर साकारण्यात आले आहे. फुकेतमधील मंदिरात विधीवत् ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने साकारलेल्या मूर्तींची ३० ऑक्टोबरला लाल महाल ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ‘दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हाला ऊर्जा मिळते’, असे ‘फुकेत ९ रियल इस्टेट कंपनी लिमिटेड’च्या अध्यक्षा, उद्योजिका पापा सॉन मिपा यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण राजूशेठ सांकला यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच मूर्तीचे विधीवत् पूजन करण्यासाठी पापा सॉन मिपा आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. उद्योजिका पापा सॉन मिपा यांनी स्वखर्चातून फुकेतमध्ये मंदिर साकारले आहे. त्यासाठी ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी चेतन लोढा यांनी समन्वय साधून विशेष सहकार्य केले.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, थायलंडमध्ये ५० फूट उंच मंदिर साकारण्यात आले आहे. हे गणपति मंदिर ‘लॉर्ड श्रीमंत गणपति बाप्पा देवालय’ या नावाने रवाई बीच फुकेतमध्ये साकारण्यात आले आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आता थायलंडसह परिसरातील भाविकांना घेता येईल.