Himanta Sarma on Muslim Population : घुसखोरीमुळे झारखंडमध्ये मुसलमानांची संख्या वाढत आहे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

रांची (झारखंड) – राज्यातील संथाल परगणामधील आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने न्यून होते आहे, तर मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याची २ कारणे आहेत, एक तर प्रत्येक कुटुंब १० ते १२ मुले जन्माला घालत आहेत किंवा बांगलादेशातील मुसलमान झारखंडमध्ये घुसखोरी करत आहेत, असे विधान आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी संथाल परगना भागातील एका प्रचारसभेत बोलतांना केले.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की,

१. आम्ही झारखंडमधील घुसखोरांची लंका दहन करू !

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा निश्‍चितच विजय होईल; मात्र निवडणूक जिंकणे, हा आमचा एकमेव उद्देश नाही, तर झारखंडमधील मुसलमान घुसखोरांना राज्यातून हाकलून लावणे आणि महिलांना न्याय देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची लंका दहन केली, त्याप्रमाणे आम्ही झारखंडमधील घुसखोरांची लंका दहन करू.

२. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करू !

झारखंडमध्ये घुसखोरी केलेल्या मुसलमानांना मदरशांत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांची आधार कार्ड नोंदणी केली जाते. अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करू.

संपादकीय भूमिका

केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याने देशातील प्रत्येक घुसखोराला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि प्रतिदिन यांची आकडेवारी जनतेला दिली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही !