दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही ! – खासदार संजय राऊत; वैयक्तिक शत्रुत्वात उद्धव यांचे नाव पहिले – आमदार नितेश राणे…

फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही ! – खासदार संजय राऊत

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. आमचे केवळ राजकीय वैर आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. नेहमी फडणवीस यांच्या विरोधात बोलणार्‍या राऊत यांनी असे वक्तव्य केल्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा चालू झाली.  राजकीय वैर राजकारणात. तो विचारांचा लढा आहे. राजकारण्यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नये, असेही राऊत या वेळी म्हणाले.


वैयक्तिक शत्रुत्वात उद्धव यांचे नाव पहिले  – आमदार नितेश राणे

मुंबई – जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात वैयक्तिक शत्रुत्व जोपासणार्‍यांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा उद्धव ठाकरे यांचे नाव पहिले येईल, असे मी अनुभवाने सांगतो, असे वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे.


अणुशक्तीनगर येथून फहाद अहमद यांना उमेदवारी !

मुंबई – अणुशक्तीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फहाद हे साम्यवादी विचारसरणीच्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत.


वांद्रे येथून असिफ झकेरिया यांना उमेदवारी

मुंबई – भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून असिफ झकेरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात प्रिया दत्त उभ्या रहाणार होत्या.


चंद्रपूर येथे किशोर जोरगेवार भाजपमध्ये

चंद्रपूर – भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये गेलेले किशोर जोरगेवार हे भाजपमध्ये परत आले आहेत. काँग्रेसमध्ये गेल्यावर ते एकदा हरले आणि एकदा निवडून आले होते.


भाजपचे मुरजी पटेल शिंदेच्या शिवसेनेत !

मुंबई – मागील पोटनिवडणुकीत अंधेरी भाजपचे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यांच्यावर अन्याय केला जाणार नाही, असे भाजप नेते आशिष शेलार त्या वेळी म्हणाले होते आणि आता शिंदे यांच्या शिवसेनेत पटेल हे जाणार असल्याचे समजते. त्या माध्यमातून त्यांना तेथे उमेदवारी देण्यात येणार आहे. परभणी येथेही असाच प्रकारे भाजपचे उमेदवार शिंदेच्या शिवसेनेत गेल्याचे वृत्त आहे.

संपादकीय भूमिका : सत्तेपुढे पक्षनिष्ठा विफल !