वर्ष २०१४ मधील कर्नाटकातील जातीय दंगलीचे प्रकरण
कोप्पल (कर्नाटक) – कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे. या सर्वांना २८ ऑगस्ट २०१४ या दिवशी गंगावती तालुक्यातील मार्ंकुबी गावात झालेल्या जातीय हिंसाचारासाठी दोषी ठरवण्यात आले होते. हिंसाचाराच्या वेळी ११७ लोकांनी दलितांच्या झोपड्या पेटवल्या होत्या; तथापि १० वर्षे चाललेल्या खटल्याच्या कालावधीत १६ आरोपींचा मृत्यू झाला. न्यायमूर्ती चंद्रशेखर सी. यांनी प्रत्येक दोषीला २ ते ५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
कोप्पलमध्ये दलितांना केशकर्तन आणि खाद्यपदार्थ यांच्या दुकानांत जाण्यापासून रोखण्यात आले होते. या वेळी दोन जातीय गटांमध्ये हाणामारी झाली. पुढे त्याला हिंसक वळण लागले. हिंसाचारात दलितांच्या झोपड्या जाळण्यात आल्या.
‘कर्नाटक राज्य दलित हक्क समिती’ने या हिंसाचाराच्या निषेधार्थ मार्ंकुबी ते बेंगळुरू असा मोर्चा काढला होता. हिंसाचाराचा प्रभाव इतका मोठा होता की, संपूर्ण परिसर तीन महिने पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवावा लागला होता. हिंसाचारातील सर्व आरोपी आता बेळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात आहेत.