पंढरपूर – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच परराज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या यात्रेचा मुख्य दिवस १४ नोव्हेंबर असून यात्रेचा कालावधी २ ते १५ नोव्हेंबर असा आहे. तरी यात्रा कालावधीत वारकरी, भाविक यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. कार्तिकी यात्रा नियोजनाविषयी विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीसाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पाणीपुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी बॅरकेडिंग करावे, अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची, तसेच प्रसादालयाच्या दुकानांची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त पथकाची नेमणूक करावी. शेगांव दुमाला ते जुना दगडीपूल येथे कोणत्याही दुकानाला अनुमती देऊ नये. यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने संबंधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.
मंदिर समितीने दर्शनरांगेत, दर्शनमंडपात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वाहतूक विभागाने शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतूक करतांना रिक्शाचालकांकडून अधिक दराची आकारणी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद आणि सुखकर दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून पत्राशेड, दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.