Alcohol, Cash In Election Campaign : निवडणूक प्रचारात मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या वापरात अनेक पटींनी वाढ !

पोलिसांच्या गोपनीय अहवालात निवडणुकींतील अपप्रकार उघड !

निवडणुकीत महाराष्ट्रात मद्य, पैसा आणि अमली पदार्थ वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्याच्या गृहविभागाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाला सादर केलेल्या गोपनीय अहवालानुसार, निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघड झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या गृहविभागाने हा अहवाल महाराष्ट्र सरकारकडे सादर केला आहे.


या अहवालानुसार, वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत वर्ष २०२४ मधील निवडणुकीमध्ये पैशांचा वापर ५ पट, मद्याचा वापर ३ पट, तर अमली पदार्थांचा तर अनेक पयींनी वाढला आहे. वर्ष २०१४ च्या विधानसभेच्या तुलनेत मद्याचा वापर दुपटीने, तर अमली पदार्थांचा वापर ४ पटींनी वाढला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईतील हे आकडे आहेत; मात्र जे मद्य, पैसे किंवा अमली पदार्थ सापडले नाहीत, ते पहाता त्यांच्या वापराचे प्रमाण पोलिसांच्या अहवालाच्या तुलनेत प्रत्यक्षात कितीतरी पटींनी अधिक असणार आहे.


वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मद्य, पैसे, अमली पदार्थ यांसह अन्य मौल्यवान वस्तू धरून एकूण १२ कोटी ४१ लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी पकडले होते; मात्र वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत १६९ कोटी ७८ लाख रुपयांचे साहित्य पकडण्यात आले.

गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !


वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ५ सहस्र ७२० गुन्हे नोंदवण्यात आले होते; मात्र वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत तब्बल २५ सहस्र २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्ष २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ३ सहस्र ६७० गुन्हे नोंद होते; मात्र वर्ष २०१९ च्या निवडणुकीत तब्बल ७ सहस्र ४१८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे आतापर्यंतची आकडेवारी पहाता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मद्य, पैसे आणि अमली पदार्थ यांचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे, तसेच गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई