‘कामानिमित्त, व्याख्यानांच्या निमित्ताने अनेकदा ज्येष्ठ नागरिक, तसेच त्यांच्या संघटना यांच्याशी संपर्क होतो. ‘योग्य प्रकारे मृत्यूपत्र बनवून देणे’, या आमच्या उद्दिष्टासाठी काम करतांना गोव्याच्या अनेक भागांत जाणे होते. पुष्कळ ज्येष्ठ नागरिक भेटतात. त्यांच्या समस्या मांडतात आणि त्याद्वारे मला त्यांच्या खर्या व्यथा कळतात.
१. ज्येष्ठ नागरिकांची स्थिती
जेव्हा समूहामध्ये बसून ज्येष्ठ नागरिक सर्व व्याख्यान ऐकतात, तेव्हा ते काहीही शंका विचारत नाहीत; परंतु कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात; परंतु व्याख्यानातील प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी हेच प्रश्न विचारलेले नसतात. जे अत्यंत खासगी आणि घरगुती स्वरूपाचे असतात. अर्थात् त्यांचे तसे वागणे अगदीच योग्य आहे; कारण कुणालाही चारचौघांमध्ये स्वतःच्या कौटुंबिक समस्या मांडायच्या नसतात. त्यासाठी त्यांना खासगीत वेळ हवा असतो आणि या वेळेत ते अतिशय दबक्या आवाजात घरच्या गोष्टी बोलू लागतात.
त्यांच्यावर दडपण आहे, हे अगदीच जाणवत असते. त्यांना अशीही भीती असते की, आमचे होणारे बोलणे शक्यतो त्यांच्या मुलाबाळांना कळू नये. त्यांच्या मते त्यांना असे वाटते की, मुले-सुना-नातवंडे यांना जर ही गोष्ट कळली, तर त्यांच्या वर्तणुकीत पालट होईल आणि त्याचा ज्येष्ठांना त्रास होईल. त्यांची ही भीती थोडी फार रास्त असते आणि थोडी फार अतिशयोक्तीने भरलेली असते. त्यांना एक तर कोणती तरी कायदेशीर गोष्ट करायची असते किंवा पुष्कळदा गोष्ट करून झालेली असते आणि ते योग्य केले आहे कि नाही ? याची चिंता सतावत असते. ज्येष्ठ व्यक्तींचा जोडीदार गेला, तर जी व्यक्ती मागे उरते, ती तशी घाबरत घाबरतच मुला-मुलीकडे रहात असते. तिला कुणालाही दुखवायचे नसते; कारण ती परावलंबी असते आणि हे नैसर्गिक आहे.
२. बक्षीसपत्र आणि त्यावरून ज्येष्ठ नागरिकांची होणारी मानसिकता
एक तर त्या व्यक्तीला ‘मृत्यूपत्र’ (विल) करायचे असते किंवा केलेले असते ते पालटायचे असते अथवा ‘बक्षीसपत्र’ (गिफ्ट डीड) करायचे असते किंवा जे केलेले आहे तिथे त्यांना पश्चात्ताप होत असतो. आपल्या हातून आपल्या मुलाबाळांनी स्वतःकडील संपत्ती आणि त्याची मालकी त्यांच्याकडून एका भावनेच्या भरात स्वतःकडे घेतलेली आहे अन् आता स्वतःची फसवणूक झालेली आहे, या न्यूनगंडात ते पछाडलेले असतात. बक्षीसपत्र ही एक त्यातीलच गोष्ट आहे. दोन मुलांमधील एक मुलगा चांगला वागत नाही आणि दुसर्यावर आईवडिलांचे दायित्व आहे, असे वाटून ते कोणताही कायदेशीर सल्ला न घेता त्याच्या नावाने रहात असलेले घर, भूमी यांसाठी ‘बक्षीसपत्र’ करतात. थोडक्यात या ‘बक्षीसपत्रा’नंतर ज्येष्ठांचा मालकी हक्क आणि दावा संपुष्टात येतो; नंतर या मुलाचीही वर्तणूक पालटायला लागते अन् त्यामुळे ज्येष्ठांची मानसिक कोंडी होते.
३. सशर्त बक्षीसपत्र करा !
एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून येथे असे उद्धृत आहे किंबहुना या जगात अजूनही ‘श्रावणबाळ’ नक्कीच आहेत, यात दुमत नाही. त्यामुळे ज्येष्ठांनी ही वाक्ये वाचून घाबरून जाऊ नये; परंतु मुख्यत्वे ज्येष्ठांची तक्रार या प्रकारात मोडते आणि हे खरे आहे की, एकदा ‘बक्षीसपत्र’ केले की, मालकी जातेच, यात काहीही दुमत नाही; परंतु याचा अर्थ असा नाही की ‘बक्षीसपत्र’ करूच नये; नक्कीच करावे. कधी कधी आवश्यकता म्हणूनही करावे लागते. मग अशा वेळेस ‘कंडीशनल गिफ्ट डीड’चा (सशर्त बक्षीसपत्र) मार्ग घ्यावा. ‘बक्षीसपत्रा’च्या ऐवजी ‘कंडीशनल गिफ्ट डीड’ करावे. याप्रमाणे ज्येष्ठांच्या काही मूलभूत आवश्यकता पूर्ण झाल्या पाहिजेत, अशा अटी लिहिणे योग्य होईल. आपल्या अधिवक्त्यांना ‘कंडीशनल गिफ्ट डीड’च करण्याचा आग्रह धरा. यामध्ये असा लाभ होतो की, नमूद केलेल्या अटी जर पाळल्या गेल्या नाहीत, तर ज्येष्ठांनी केलेले ‘बक्षीसपत्र’ हे पुन्हा केले जाते आणि परत त्या संपत्तीची मालकी पुन्हा एकदा मूळ मालकाकडे येते. ‘युसुफ्रुकट’ हा शब्दप्रयोग आपल्या अधिवक्त्यांना ‘बक्षीसपत्रा’मध्ये करायला सांगा, म्हणजे ज्येष्ठांना अगदी त्यांच्या शेवटपर्यंत त्यांच्या कुटुंबियांवर नियंत्रण ठेवता येते. (‘युसुफ्रुकट’, म्हणजे हयात असेपर्यंत भूमी, घर यांचा उपभोग घेणे आणि संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर जरी ‘सशर्त बक्षीसपत्र’ झाले असले, तरी रहाता येणे !) नपेक्षा त्यांनी ‘मृत्यूपत्र’ केलेले अधिक श्रेयस्कर होईल.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.