ठेवीदारांच्या ९७.४१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण !
छत्रपती संभाजीनगर – येथील अजिंठा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांचे अटकपूर्व जामीन आवेदन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन्.एम्. जामदार यांनी फेटाळले आहे. ठेवीदारांच्या अनुमाने ९७.४१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात झांबड हे मुख्य आरोपी आहेत. अद्याप त्यांना अटक झालेली नाही. फसवणूक प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखेकडे असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.कुलकर्णी यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने २ वेळा आणि संभाजीनगर खंडपिठानेही फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती; मात्र अध्यक्ष झांबड यांना अटक केलेली नव्हती.
काय आहे प्रकरण ?
१८ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात विशेष लेखा परीक्षकांनी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या आदेशावरून अजिंठा बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी, बँकेचे लेखा परीक्षण करणारे खासगी लेखापरीक्षक सतीश मोहरेंसह कर्मचारी आणि २००६ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीतील बँकेच्या सर्व संचालकांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्यानुसार वरील आरोपींविरुद्ध अपहार, ठेवीदारांची फसवणूक, ३६ लोकांच्या बनावट ठेवी आणि त्यांना कर्जाचे बनावट वाटप केल्याचे दाखवण्यात आल्याने गुन्हा नोंदवला आहे.