SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ‘बेस्ट’च्या बसगाड्यांमधील सूचनांमध्ये अनेक चुका !

  • जनता संपर्क अधिकार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद !

  • ‘बेस्ट’ बसगाड्यांतील लिखाण पडताळण्याच्या यंत्रणेविषयी सूचना पाठवण्याची विनंती !

सौ. रूपाली वर्तक, पनवेल

मुंबई – मुंबईला सतत धावती ठेवणार्‍या ‘बेस्ट’ (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सूचना देणार्‍या पाट्या असतात किंवा सूचनांची वाक्ये रंगाने लिहिलेली असतात. या सूचनांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातील शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या अनेक चुका असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात ‘बेस्ट’चे जनता संपर्क अधिकारी सुदास सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ‘चुकांच्या संदर्भात आम्हाला सुचित केल्यास आम्ही वरील अधिकार्‍यांना त्याविषयी सांगू आणि त्यावर अवश्य विचार करू’, असे आश्‍वासन दिले.

लवकरच ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने त्यांना ‘बेस्ट’च्या बसगाड्यांमधील आणि संबंधित सूचनांमधील चुकांविषयीचे निवेदन देण्यात येणार आहे आणि त्या चुका सुधारण्याची विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सुराज्य अभियाना’चे श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली.

घटस्थापनेच्या मुहुर्तावर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा आणि ती अधिकाधिक शुद्ध लिहिली जावी, या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करणे, हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने सावंत यांच्याशी संवाद साधला.

‘बेस्ट’ बसगाड्यांतील लिखाण पडताळण्याच्या यंत्रणेविषयी सूचना पाठवण्याची ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला विनंती !

‘बेस्ट’चे जनता संपर्क अधिकारी सुदास सावंत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्व काही प्राथमिक स्वरूपात लिखित पाठवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना ‘बेस्ट’च्या बसगाडीतील २ पाट्यांची छायाचित्रे आणि त्यांतील चुका पाठवण्यात आल्या. त्यानंतर सावंत यांनी बसगाड्यांतील पाट्यांवरील लिखाण पडताळण्याच्या यंत्रणेविषयीच्या सर्व सूचना विस्तृतपणे पाठवण्याची विनंती ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला लिखित स्वरूपात केली.

भाषेचे व्याकरण किंवा शुद्धलेखन पडताळण्यासाठी वेगळे कुणी तज्ञ नाही ! – सुदास सावंत, जनता संपर्क अधिकारी, बेस्ट

जनता संपर्क अधिकारी सावंत म्हणाले, ‘‘बेस्ट’मध्ये १०० टक्के मराठी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे ते स्वतःच या सूचना सिद्ध करतात. सूचनेतील भाषेचे व्याकरण किंवा शुद्धलेखन पडताळण्यासाठी वेगळे कुणी तज्ञ नाही.’’

बेस्टच्या बसगाड्यांच्या पाटीतील चुकलेले शब्द आणि त्याजागी हवे असलेले योग्य शब्द !

‘बेस्ट’च्या बसगाड्यांतील चुका असणार्‍या २ पाट्यांची छायाचित्रे येथे देत आहोत. चुका छायाचित्रात अधोरेखित केल्या आहेत. त्यांतील सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत.

छायाचित्र क्र. १.

१. ‘वस्तूंची’ या शब्दात ‘स्तू’ हा दीर्घ हवा.

२. ‘पोलिसांना’ या शब्दात अनुस्वार ‘सा’वर हवा, ‘ना’वर नको.

३. ‘न्यावी’ या शब्दात ‘वी’ हा दीर्घ हवा.

४. ‘आणि’ या शब्दाच्या आधी ‘स्वल्पविराम’ नको.

५. ‘अधिकार्‍यांच्या’ या शब्दात ‘क’ चा काना त्याला एकदमच चिकटून आला आहे.

६. ‘प्रतीक्षा’ या शब्दात ‘ती’ हा दीर्घ हवा.

छायाचित्र क्र. २

१. ‘बसगाडीमधून’ हे दोन शब्द जोडून हवेत.

२. ‘असतांना’ या शब्दात ‘ता’ अक्षरावर अनुस्वार हवा.

३. ‘प्रवाशांनी’ या शब्दात ‘शा’ असे हवे.

४. ‘मोबाईल’ हा इंग्रजी शब्द आहे. त्याऐवजी ‘भ्रमणभाष’ म्हणू शकतो.

५. ‘टाळावे’ या शब्दानंतर पूर्णविराम हवा.