Pannu On Arunachal Pradesh : (म्‍हणे) ‘चीनने अरुणाचल प्रदेशवर आक्रमण करावे !’

खलिस्‍तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्‍नू याची चीनला चिथावणी

आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्‍नू

ओटावा (कॅनडा) – ‘सिख फॉर जस्‍टिस’ या बंदी घालण्‍यात आलेल्‍या खलिस्‍तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्‍नू याने ‘चीनने अरुणाचल प्रदेशावर आक्रमण करण्‍याची वेळ आली आहे’, असे विधान केले आहे.

१. कॅनडाचे उप परराष्‍ट्रमंत्री डेविड मॉरिसन यांनी ‘भारत हा एक देश आहे. त्‍याच्‍या सार्वभौमत्‍वाचा सन्‍मान केला जावा’, असे म्‍हटले होते. याविरोधात पन्‍नूने एक व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्‍ये त्‍याने ‘वन इंडिया’ला वर्ष २०४७ पर्यंत ‘नो इंडिया’ करायचे असल्‍याचे म्‍हटले आहे.

२. पन्‍नू याने चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांना उद्देशून ‘आता चिनी सैन्‍याला अरुणाचल प्रदेश परत मिळवण्‍यासाठी आक्रमण करण्‍याचा आदेश द्या’, अशी मागणी केली आहे. अरुणाचल प्रदेश चीनचाच भाग असल्‍याच्‍या चीनच्‍या दाव्‍याला त्‍याने पाठिंबा दर्शवला आहे. ‘तसेच ‘कॅनडा आणि अमेरिका येथील कायद्यांचा वापर भारत तोडण्‍यासाठी करत राहणार असून वर्ष २०४७ पर्यंत भारताची सीमा पुन्‍हा एकदा आखली जाईल. भारत जगाच्‍या नकाशावरून गायब होईल’, अशी धमकी पन्‍नू याने दिली आहे.

संपादकीय भूमिका

कॅनडा आणि अमेरिका यांचे नागरिकत्‍व असणारा पन्‍नू सातत्‍याने भारतविरोधी विधाने करत आहे आणि हे दोन्‍ही देश त्‍याच्‍यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, यातून या देशांचा पन्‍नू याला संपूर्ण पाठिंबा असून त्‍यातून त्‍यांचा भारताद्वेष लक्षात येतो. अशा देशांपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्‍यक आहे !