मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे माहिती सादर
मुंबई – महाराष्ट्रात वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीत माओवादाच्या विरोधातील अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. वर्ष २०१३ मध्ये सशस्त्र माओवाद्यांच्या गटांची संख्या ५५० होती, ती २०२४ मध्ये ५६ झाली आहे. मागील ६ वर्षांत महाराष्ट्रात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले. १६१ जणांना पकडण्यात आले, तर ७० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सादर केली.
डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्राची सुरक्षा आणि विकास यांविषयी ७ ऑक्टोबर या दिवशी नवी देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ही माहिती सादर केली. नक्षलग्रस्त भागातील रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांविषयीच्या योजनांची यशस्वी कार्यवाही महाराष्ट्र शासनाने केली आहे. उत्तर गडचिरोली हे सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. या भागात भीती आणि आतंकवाद यांवर मात करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले.