देशात फोफावणारा फुटीरतावाद नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांवर राष्ट्रप्रेमाचे संस्कार निर्माण करणे आवश्यक !
मिरज, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय षड्यंत्राद्वारे पोसल्या जात असलेल्या शेकडो फुटीरतावादी आणि आतंकवादी समुहांच्या कारवायांमुळे ईशान्य भारत सातत्याने धुमसत आहे. ‘ईशान्य भारताला संपूर्ण भारतापासून कायमचे तोडणे’, हेच या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे अंतिम उद्दिष्ट आहे. आपण सर्वांनी जागरूक राहून हे षड्यंत्र हाणून पाडूया, असे आवाहन ‘पूर्व सेवा विकास प्रतिष्ठान’चे श्री. जयवंत कोंडविलकर यांनी उपस्थितांना केले. येथील छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खरे मंदिर वाचनालय येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘धुमसता ईशान्य भारत’ या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या वतीने मणिपूर येथे सध्या ३ शाळांमध्ये ५०० हून अधिक स्थानिक विद्यार्थी शिकत असून त्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे दिले जात आहेत. फुटीरतावाद नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांवर राष्ट्रप्रेमाचे संस्कार निर्माण करणे, हाच पर्याय उपलब्ध असून तो अवलंबल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा’ या विषयावर बोलतांना सौ. विनीता तेलंग म्हणाल्या की, प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्माधिष्ठित राज्य चालवून हिंदूंची अनेक तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांना साहाय्य केले. त्याचप्रमाणे अयोध्या, द्वारका, रामेश्वरम् यांसारख्या भारतातील शेकडो तीर्थक्षेत्रांनाही त्यांच्या कारकीर्दीत सर्व प्रकारचे साहाय्य मिळाले. अपार धर्मनिष्ठा, स्वराज्यासाठी केलेला सर्वस्वाचा त्याग आणि हिंदु धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले संस्मरणीय कार्य यांमुळेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आजही ‘आदर्श राज्यकर्त्या’ म्हणून उल्लेखनीय आहेत.