‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेली पुढील चौकट माझ्या वाचनात आली.
‘गुरु आणि ईश्वर’ यांच्या संदर्भात बोलतांना बरेच जण पुढील ओळी सांगतात,
गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।
नमस्कार आधी कोणा करावा ।। १ ।।
मना माझीया गुरु थोर वाटे ।
जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ।। २ ।।
त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, ‘गुरु शिष्याला द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे शिकवतात. ईश्वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाविना शिष्याला ईश्वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे. एखाद्याने एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता सांगितला किंवा वाटाड्या म्हणून तो सोबत आला, असे गुरूंचे नसते. ते सूक्ष्मातून आशीर्वाद देऊन शिष्याला ईश्वराकडे जाण्यासाठी बळही पुरवतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले (१४.४.२०१४)
ही चौकट वाचून मला आठवले, ‘पूर्वी रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात अधूनमधून याग होत असत. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले पुष्कळ शारीरिक थकवा असतांनाही यागाच्या दर्शनासाठी येत असत. यज्ञकुंडाजवळ येण्याआधी ते आश्रमातील स्वागतकक्षाच्या बाजूला असलेल्या त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे अत्यंत नम्रतेने आणि भावपूर्ण दर्शन घ्यायचे. नंतर ते स्वागतकक्षाच्या समोरील भिंतीवरील श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घ्यायचे. त्यानंतर श्रीसिद्धिविनायकाच्या मूर्तीचे आणि शेवटी भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेत असत.
परात्पर गुरु डॉक्टरांनी वरील चौकटीत देवापेक्षा गुरूंची थोरवी वर्णिली आहे. त्यानुसार ते आधी त्यांच्या गुरूंना आणि नंतर देवतांना नमस्कार करतात. त्यांनी ही कृती अनेक वेळा याच क्रमाने केलेली मी पाहिली आहे. त्याचा संस्कार माझ्या मनावर झाल्याने मीही आधी गुरूंना आणि त्यानंतर देवतांना वंदन करू लागलो.
यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टर समष्टीला मार्गदर्शन करण्याआधी ते सूत्र स्वतः आचरणात आणत असतात’, हे लक्षात येते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०२४)