किशोर घाटे  (वय ७४ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे, त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

४.१०.२०२४ या दिवशी (कै.) किशोर घाटे (वय ७४ वर्षे) यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले कै. किशोर घाटे  !

श्रीमती माधवी घाटे

‘माझे यजमान (श्री. किशोर घाटे) रुग्णालयात असतांना एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ भ्रमणभाषवरून (व्हिडिओ कॉलवरून) यजमानांशी बोलत होत्या. त्यांनी यजमानांना विचारले, ‘‘बाबा, नामजप चालू आहे का ?’’ तेव्हा यजमानांनी ‘नामजप चालू आहे’, असा प्रतिसाद दिल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पुन्हा यजमानांना विचारले, ‘‘बाबा, कोणता नामजप करत आहात ?’’ तेव्हा यजमान म्हणाले, ‘‘परम पूज्य डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले).’’ त्यानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी यजमानांना ‘परम पूज्य डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करा’, असे सांगितल्यावर यजमानांनी डोके वाकवून आणि हात वर करून नमस्कार केला.’

– श्रीमती माधवी घाटे (पत्नी) (वय ७० वर्षे), फोंडा. गोवा. (२८.९.२०२४)

मूळचे बेळगावचे आणि सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास असलेले किशोर घाटे (वय ७४ वर्षे) यांचे २२.९.२०२४ या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता निधन झाले. ४.१०.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. नेहा प्रभु (मोठी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. नेहा प्रभु

१ अ. रुग्णालयात असतांना साहाय्य करणार्‍या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

‘१०.९.२०२४ या दिवशी बाबांना (कै. किशोर घाटे यांना) फोंडा येथील रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा त्यांना यकृत खराब होऊन आकसणे (‘लिव्हर सिरोसिस’) नावाचा रोग झाल्याचे निदान झाले. मी त्यांची सेवा करत असतांना बाबा त्यांना साहाय्य करणार्‍या प्रत्येक व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते. त्यांचा ‘देव माझ्यासाठी किती करतो !’, असा भाव होता.

१ आ. रुग्णालयात असतांना बाबांचे अखंड नामस्मरण चालू होते.

१ इ. भावाच्या स्तरावर रहाणे

सावईकर रुग्णालयात असतांना रात्री २ वाजता बाबांनी मला हाक मारली आणि म्हणाले, ‘‘मी माझे हात खाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे; पण मला ते खाली ठेवता येत नाहीत. ते हात अधांतरीच रहात आहेत. माझा एक हात श्री गणेश आणि दुसरा हात श्रीकृष्ण यांनी धरला आहे.’’ या वेळी त्यांचा पुष्कळ भाव जागृत होत होता.

१ ई. सावईकर रुग्णालयात असतांना मिळालेले साहाय्य

१ ई १. घराजवळ रहाणारे श्री. विजय नाईक यांनी साहाय्य करणे : आमच्या घराजवळ रहाणारे श्री. विजय नाईक यांनी बाबांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. ते बाबांना काय हवे-नको, ते जाणून घेऊन आणून द्यायचे. जेव्हा मला बाबांसाठी एखादी गोष्ट करणे अशक्य होत असे, तेव्हा ते स्वतःच यायचे आणि साहाय्य करायचे. ‘देवच त्यांच्या माध्यमातून साहाय्य करत आहे’, असे मला वाटायचे.

१ ई २. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर पोटातील पाणी सहजपणे बाहेर काढता येणे : सावईकर रुग्णालयात असतांना बाबांच्या पोटातील पाणी काढायचे ठरले. त्या वेळी पाणी काढण्यास अडचणी येत हाेत्या. बाबांच्या पोटातील पाण्याऐवजी रक्तच बाहेर येत होते; म्हणून दुसर्‍या दिवशी पाणी काढायचे ठरले. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी बाबांसाठी नामजपादी उपाय करायला सांगितले. त्यांनी ‘महाशून्य’ हा जप करायला सांगितला. दुसर्‍या दिवशी बाबांच्या पोटातून दीड लिटर पाणी सहजपणे काढता आले. यावरून आम्हाला नामजपादी उपायाचे सामर्थ्य अनुभवता आले.

१ उ. मणिपाल रुग्णालयात असतांना आधुनिक वैद्यांनी साहाय्य करणे

बाबांना मणिपाल रुग्णालयात भरती केल्यावर लक्षात आले की, आता बाबांवर उपचार होणे शक्य नाही. केवळ त्यांचे जीवन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तेथील साधक डॉ. राकेश देशमाने यांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले. ‘त्यांच्या माध्यमातून ईश्वरच साहाय्य करत आहे’, असे मला जाणवत होते.

१ ऊ. संत आणि गुरु यांनी आधार देणे

१ ऊ १. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी कुटुंबियांचे सांत्वन करून आधार देणे : बाबांचे निधन झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी बाबांच्या आजारपणाविषयी सर्व जाणून घेतले. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘काळजी करू नका. देवाने बाबांचे प्रारब्ध न्यून केले आहे. त्यांच्या यातना न्यून केल्या आहेत. तुम्हाला काही साहाय्य लागले, तर सांगा.’’ तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘एका साधक ज्योतिषाने बाबांची पत्रिका पाहिल्यावर सांगितले होते की, ते अजून एक वर्ष तरी जगतील; पण आताची त्यांची स्थिती पहाता त्यांना पुष्कळ यातना भोगाव्या लागल्या असत्या.’’ तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘बघा तुमच्याकडून समजण्याआधी देवाने हेच माझ्याकडून वदवून घेतले.’’ ‘तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून परम पूज्य डॉक्टरच आम्हाला आधार देत आहेत आणि आमचे सांत्वन करत आहेत’, असे मला वाटले.

१ ऊ २. संतांनी आधार देणे : त्यानंतर लगेचच पू. परांजपेआजी यांचा भ्रमणभाष आला. त्यांनीही आम्हाला आधार दिला. असे वाटत होते की, साक्षात् देव आम्हाला या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी संतांच्या माध्यमातून बळ पुरवत आहे.

१ ऊ ३. कुटुंबीय आणि साधक यांनी साहाय्य करणे : आमचे अन्य कुटुंबीय, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधक यांनी आम्हाला पदोपदी साहाय्य केले. सर्व जण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आम्हाला सर्वांकडून पुष्कळ आधार मिळाला. त्यांच्या माध्यमातून गुरुमाऊलीच साहाय्याला आली होती आणि त्यामुळे मी स्थिर राहू शकले. यासाठी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२. योगिता घाटे (धाकटी मुलगी), फोंडा, गोवा.

योगिता घाटे

२ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी बोलण्याने बाबांचे प्रारब्ध सुसह्य होणे : माझ्या बाबांचे निधन झाले, त्या दिवशी गुरुकृपेने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी बाबांकडून भावप्रयोग आणि विविध देवतांचे नामजप करवून घेतले. त्या म्हणाल्या, ‘‘बाबांना सर्व देवतांची तत्त्वे मिळावी; म्हणून असे केले.’’

२. बाबांना पुष्कळ वेदना होत होत्या; पण त्यांच्या चेहर्‍यावरून तसे जाणवत नव्हते. त्याही अवस्थेत बाबांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना आनंदाने आणि हसत प्रतिसाद दिला.

३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी बोलणे झाल्यामुळे श्री गुरूंनी बाबांचे प्रारब्ध सुसह्य केले. त्यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

२ आ. कृतज्ञताभावात असणे : बाबांना पुष्कळ यातना होत होत्या; पण तरीही त्यांच्या चेहर्‍यावर कृतज्ञताभाव जाणवत होता.

२ इ. बाबांसाठी भावप्रयोगासहित नामजप होणे : बाबांना वेदनांमुळे नामजप करणे शक्य नव्हते; म्हणून मी त्यांच्यासाठी नामजप करत होते. तेव्हा आपोआपच भावप्रयोग होत होते. तसेच ‘त्यांच्या संपूर्ण शरिरामध्ये नामजप भरले जात आहेत’, या भावाने माझ्याकडून नामजप होत होता.

बाबांची शेवटची वेळ आल्यावर गुरुकृपेमुळे त्यांना संतांचा सहवास मिळाला आणि त्यांनी नामस्मरण करत प्राण त्यागले. हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले. त्यासाठी परम पूज्य डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

३. कु. मानसी प्रभु (नात, मोठ्या मुलीची (सौ. नेहा प्रभु यांची) मुलगी) सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.

कु. मानसी प्रभु

‘माझ्या आजोबांची गणेशावर पुष्कळ श्रद्धा होती. त्याची उदाहरणे येथे दिली आहेत.

१. आजोबा म्हणायचे, ‘‘जे काही करत आहे आणि जे काही घडत आहे, ते मोरयामुळे (श्री गणेशामुळे) होत आहे.’’

२. ते सकाळी उठल्यावर लवकर अंघोळीला जायचे. याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणायचे, ‘‘माझा श्री गणेश माझी पूजेसाठी वाट बघत आहे.’’ ते वेळेतच पूजा करायचे. एखाद्या वेळेस उशीर झाला, तर ते श्री गणेशाची क्षमा मागायचे.

३. आजोबा पूजा करतांना प.पू. भक्तराज महाराजांची भजने म्हणायचे.

४. त्यांना कोणतीही अडचण सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘मोरया आहे ना ! कशाला काळजी करतेस.’’

(सर्व सूत्रांचा दिनांक २८.९.२०२४)