आज ‘घटस्थापना’ (नवरात्रारंभ) होत आहे. त्या निमित्ताने…
‘आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून चालू होणार्या नवरात्र काळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.
१. नवरात्र व्रताचे प्रकार
अ. प्रतिपदा ते नवमी : हे ९ दिवस संपूर्ण नवरात्रव्रत.
आ. प्रतिपदा ते सप्तमी : सप्तरात्रीव्रत.
इ. पंचमी ते नवमी : पंचरात्रीव्रत.
ई. सप्तमी ते नवमी : त्रिरात्रीव्रत.
उ. केवळ अष्टमीव्रत.
अशी ५ व्रते असतात.
२. नवरात्राची अंगे
नवरात्राची प्रमुख ४ अंगे आहेत. ती म्हणजे देवता-स्थापना, मालाबंधन, नंदादीप आणि कुमारिका पूजन ही होत. काही जणांकडे वेदिका (शेत) स्थापन करतात. त्यासाठी शेतातील काही माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात १ वीत लांब असावी आणि कुंकवाने पूर्ण रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास २ समया लावाव्यात. नवरात्रीचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकतांना शांत झाल्यास कुलदेवीचा नामजप १०८ वेळा किंवा १००१ वेळा करावा किंवा ‘विष्णुसहस्रनाम’ वाचावे. नवरात्रात मालाबंधन करतांना त्या वेळी उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलापानांची माळ बांधावी.
३. कुमारिका पूजन
कुमारी मुलीची पूजा हा व्रताचा प्राण आहे. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत प्रतिदिन किंवा सप्तमीच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुऊन तिला मिष्ठान्न भोजन द्यावे. स्कंद पुराणात कुमारिकेच्या वयानुसार तिचे प्रकार असे आहेत.
अ. २ वर्षाची कुमारी
आ. ३ वर्षांची त्रिमूर्तीनी
इ. ४ वर्षांची कल्याणी
ई. ५ वर्षांची रोहिणी
उ. ६ वर्षांची काली
ऊ. ७ वर्षांची चंडिका
ए. ८ वर्षांची शांभवी
ऐ. ९ वर्षांची दुर्गा
ओ. १० वर्षांची सुभद्रा.
४. वयानुसार केलेल्या कुमारी पूजनाचे फळ पुढीलप्रमाणे
अ. एक वर्ष : ऐश्वर्य
आ. दोन वर्ष : भोग आणि मोक्ष
इ. तीन वर्ष : धर्म, अर्थ, काम आणि प्राप्ती
ई. चार वर्ष : राजपदप्राप्ती
उ. पाच वर्ष : विद्याप्राप्ती
ऊ. सहा वर्ष : षट्कर्मसिद्धि
ए. सात वर्ष : राज्यप्राप्ती
ऐ. आठ वर्ष : संपत्ती
ओ. नऊ वर्ष : पृथ्वीचे राज्य मिळते.
५. नवरात्रात ‘सप्तशतीपाठा’चे महत्त्व
एक एक अक्षर अग्नीसमान आहे. ‘मार्कंडेय पुराणा’त देवी असे म्हणते की, जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन. सर्व दुष्ट स्वप्ने आणि उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असतांना सप्तशतीपाठ श्रवण केल्यास त्या दूर होतील. राहूकालात सप्तशतीपाठाचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
आश्विन मासातील अष्टमीस अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते, तसेच याच दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती झाली; म्हणून या तिथीस महाष्टमी म्हणतात.
नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य दाखवावेत, हे ‘देवी भागवत ग्रंथा’त सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे
अ. रविवार : पायस (खीर)
आ. सोमवार : गायीचे तूप
इ. मंगळवार : केळी
ई. बुधवार : लोणी आणि साखर
उ. गुरुवार : खडीसाखर
ऊ. शुक्रवार : साखर
ए. शनिवार : गायीचे तूप
नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्रवाचन, महालक्ष्मीअष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देव्यपराध स्तोत्र, श्रीसूक्त, शुलिनीदुर्गासुमुखि स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे वाचन करावे. सात्त्विक अन्नाचे सेवन करावे. ब्रह्मचर्यपालन करावे. दाढी-कटींग करू नये. गादीवर आणि पलंगावर झोपू नये. नवरात्रीत नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तीभाव अधिक वृद्धिंगत होतो.
– ज्योतिषी श्री. ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे (क्रमशः)
(साभार : ‘धार्मिक’, दिपावली विशेषांक २०१७)
या लेखाचा पुढील भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840375.html