इस्रायलसारखी प्रखर राष्ट्रनिष्ठा हवी !

पेजर, वॉकीटॉकी यांच्याद्वारे बाँबस्फोट करण्याविषयीचे प्रातिनिधिक चित्र

१. सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये पेजर, वॉकीटाकी अन् सोलर यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्यात आले स्फोट !

‘१७.९.२०२४ या दिवशी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये पेजरचे बाँबस्फोट झाले. त्यामुळे जगभरात एकच खळबळ निर्माण झाली. यापूर्वी ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेला संशय होता की, ते वापरत असलेल्या भ्रमणभाष संचांमुळे त्यांचे स्थान (लोकेशन) शत्रूला समजते. त्यांना मुख्य भीती इस्रायलपासून होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आतंकवाद्यांना भ्रमणभाषसंच बंद करून ‘पेजर’ (त्यावर केवळ संदेश वाचता येतो.) बाळगायला सांगितले. पेजर हे वर्ष १९९० च्या दशकामध्ये लोकप्रिय होते. भ्रमणभाष संच आल्यानंतर लोकांनी पेजर वापरणे बंद केले. ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः’ (विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होते.) या सुभाषिताप्रमाणे हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांनी भ्रमणभाष संच बंद करून पेजर घेतले. १७.९.२०२४ या दिवशी पेजरमध्ये साखळी बाँबस्फोट झाले. या स्फोटात एका बालिकेसह ३७ व्यक्ती मरण पावल्या आणि अनुमाने ३ सहस्र लोक घायाळ झाले. आतंकवादी आणि मृत्यूमुखी पडलेले लोक यांच्यावर अंत्यसंस्कार चालू असतांनाच ‘वॉकीटॉकी’मध्येही (बिनतारी संदेश देवाणघेवाण करण्यासाठी वापरण्यात येणारा संच) स्फोट झाल्याचे समोर आले. लेबनॉनमध्ये हे स्फोट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आले. हे स्फोट दुकानांमध्ये, कामावर असतांना, घरी, लोकांचे शर्ट, सलवार, पँट अशा विविध ठिकाणी करण्यात आले. दिवाळीतील फटाक्यांसारख्या आवाजाचे हे स्फोट सुमारे दीड घंटे चालू होते. मृतक आणि घायाळ यांच्यामध्ये हिजबुल्लाचे जिहादी असल्याचा संशय आहे.

अशी माहिती आहे की, ‘पेजर अल्फा न्यूमरिक’ या आस्थापनाने तैवानमधील आस्थापनेकडून ३ सहस्र पेजर्स खरेदी केले होते. लेबनॉनच्या दक्षिण भागात आणि बैरुतच्या दक्षिण उपनगरात वाकीटॉकी, तसेच रेडिओ संच यांचे स्फोट झाले. अर्थात्च या सर्वांसाठी हिजबुल्ला संघटनेने इस्रायलला दोषी ठरवले. या स्फोटांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. हे पेजर आतंकवाद्यांनी ५ मासांपूर्वी खरेदी केले होते. या पेजर्समध्ये स्फोटके पेरली होती, असा आरोप लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी केला. या अाक्रमणात आतंकवादी गटातील अनेक जिहादी आणि बैरुतमधील इराणचे राजदूत यांच्यासह शेकडो लोक घायाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. पेजर स्फोटांमध्ये विविध आस्थापनांची गूढ भूमिका

या पेजर आक्रमणानंतर मूळ भारतीय असलेल्या रिनसन जोस याचे नाव समोर आले. केरळमधील वायनाड येथील मूळचा निवासी जोस हा बल्गेरियाचे आस्थापन ‘नोटा ग्लोबल लिमिटेड’चा मालक आहे. या आस्थापनेच्या माध्यमातून हिजबुल्लाला पेजर पुरवले, असे म्हटले जाते. हंगेरीतील एका मुख्य कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टियानो बारसोनी याचेही नाव संशयितांच्या सूचीत आहे. तैवान, हंगेरी आणि बल्गेरिया येथील आस्थापनांची नावे या प्रकरणात समोर येतात. बल्गेरियाकडून ‘नोटा ग्लोबल लिमिटेड’ आस्थापनाचा मालक नॉर्वेचा नागरिक आहे. बल्गेरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून वृत्त आले की, कोणतीही निर्यात झालेली नाही. पेजर स्फोटात या आस्थापनेची काही भूमिका नाही, असे यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. सैन्यातील निवृत्त अधिकार्‍यांच्या मते, लेबनॉनमधील पेजर्स स्फोटांमुळे आधुनिक युद्धनीतीला नवे आव्हान देण्यात आले आहे.

आता संगणकीय युद्ध करण्यात इस्रायलची अत्याधुनिक शक्ती कार्यरत आहे, असे दिसते. पेजर या ‘वायरलेस’ दूरसंचार उपकरणातून आवाजी संदेश प्राप्त आणि प्रदर्शित करते. असे असतांना हिजबुल्लासाठी सुरक्षेचे उल्लंघन अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ठरली आणि संपूर्ण संरक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. असे म्हणतात की, इस्रायलने या पेजर्स स्फोटाची सिद्धता १५ वर्षांपूर्वीच केली होती. हंगेरीतील ‘बीएसी कन्सल्टिंग केएफ्टी’ आस्थापनाने हे पेजर बनवल्याचा दावा तैवानचे आस्थापन ‘गोल्ड अपोलो’ने केला आहे. ‘या आस्थापनेचा  कुठलाही कारखाना त्यांच्या देशात नाही’, असे हंगेरी सरकारने स्पष्ट केले. याचा अर्थ इस्रायलच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी हे पेजर बनवण्यासाठी बनावट आस्थापनेचा वापर केला. इस्रायलला पेजर्स स्फोटातून हिजबुल्लाचे ५ सहस्र सदस्य मारायचे होते.

३. हुती बंडखोर आणि हिजबुल्ला संघटनेचे मुख्य आतंकवादी इस्रायलने केलेल्या आक्रमणात ठार

प्रातिनिधिक चित्र

पेजर, वॉकीटॉकी आणि सोलर यांच्याद्वारे केलेल्या आक्रमणानंतरही इस्रायलने लेबनॉनमध्ये अनेक बाँबस्फोट करून  सहस्रो जणांना ठार केले. लेबनॉनमधून लाखो लोक घराबाहेर काढण्यात आले. आता इस्रायलकडून हुती बंडखोरांना लक्ष्य केले जात आहे. इस्रायलने हुती बंडखोरांच्या ठिकाणावर आक्रमण करून त्यात १०० हून अधिक बंडखोर मृत्यू झाल्याचे कळते. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या लष्करी आक्रमणात हिजबुल्लाचा मुख्य प्रमुख नसरूल्ला याला ठार मारले. यानंतर संघटनेचा उपप्रमुख नबील कौक हा आता हिजबुल्ला संघटनेचा मुख्य झाला असता त्यालाही ठार केले.

४. खेळाडूंच्या हत्येचा सूड घेणारा इस्रायल

म्युनिच ऑलिंपिकमध्ये पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी इस्रायलच्या ११ खेळाडूंची हत्या केली

इस्रायल सूडाच्या प्रवासात कुठपर्यंत मजल गाठू शकतो, हे आजवर जगाने अनेकदा अनुभवले आहे. दुर्दैवाने धर्मांध मुसलमान अनेक वेळा त्यांच्या हातून मरूनही अनुभवातून काही शिकत नाहीत. वर्ष १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिकमध्ये पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी इस्रायलच्या ११ खेळाडूंची हत्या केली होती. त्या सर्व आतंकवाद्यांना इस्रायलच्या गुप्तचर संस्थेने नियोजनपूर्वक संपवले. प्रत्येक आतंकवाद्यांना मोजून ११ गोळ्या घातल्या गेल्या. हे दर्शवण्यासाठी की, त्यांचे ११ खेळाडू एकाच दिवशी मृत्यूमुखी पडले.

हिजबुल्लाच्या संघर्षामुळे इस्रायलच्या उत्तर सीमेवरील लोक घरेदारे सोडून जात आहेत. सेकंड टॉप कमांडर इब्राहिम अखिल याला संपवून इस्रायलने त्यांना ‘हिजबुल्लाचे अस्तित्व कुठल्याही परिस्थितीत नको’, असा संदेश स्पष्टपणे पाठवला. टेलिफोन, वॉकीटॉकी, पेजर, सोलर यंत्रणा अशा कोणत्याही माध्यमातून स्फोट करण्याची युक्ती वापरून इस्रायल शत्रूची शक्ती न्यून करू शकतो. हिजबुल्लाला तर अशी धास्ती बसली की, उद्या पाऊस लागू नये; म्हणून छत्र्या उघडल्या, तर त्यातून स्फोट होऊ नये, असे वाटते.

४. भारताने बचावात्मक पवित्रा सोडून इस्रायलसारखी आक्रमकता दाखवणे आवश्यक !

एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मोगल आणि अन्य धर्मांध आक्रमकांमध्ये अशीच दहशत बसवली होती. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोगल, आदिलशहा, निजाम आणि कुतूबशाह यांच्या सैनिकांना त्यांनी यमसदनी पाठवले होते. दुर्दैवाने पुढे इंग्रज आले आणि त्यांनी धर्मांधांना हाताशी धरून ‘फोडा अन् राज्य करा’, ही नीती वापरून राज्य केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या ७७ वर्षीय लोकशाहीत काँग्रेस आणि तिच्या समकक्ष अन्य पक्षांनी धर्मांधांना डोक्यावर घेऊन त्यांच्या हातून मरणे पसंत केले. भारताने आजही पाकिस्तान किंवा अन्य ठिकाणी असलेल्या शत्रूंना इस्रायलच्याच पद्धतीने संपवले पाहिजे, तरच भारत जगातील  तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकेल. त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे. भारतात गेली काही दशके हिंदू केवळ बचावात्मक स्थितीत रहात आहे. केंद्र सरकार बचावात्मक पवित्रा सोडून जेव्हा इस्रायलसारखी प्रखर राष्ट्रनिष्ठा दाखवेल, तेव्हा जिहादी भारताच्या वाटेला जाणार नाहीत.

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२३.९.२०२४)