गर्भाशय शुद्धीकरण (Uterine Detox) आणि आयुर्वेद

आजकाल समाजमाध्यमे, इंटरनेट आणि विविध आरोग्यविषयक विज्ञापने यांमध्ये ‘Uterine Detox’ किंवा ‘गर्भाशय शुद्धीकरण’ हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. अनेक महिलांना असे वाटते की, गर्भाशयामध्ये घाण किंवा विषारी द्रव्ये साचतात आणि ती बाहेर काढण्यासाठी विशेष उपचार करावे लागतात; परंतु ‘आयुर्वेद’ या विषयाकडे अधिक सखोल अन् शास्त्रीय दृष्टीकोनातून पहातो.

आयुर्वेदानुसार निरोगी गर्भाशय, म्हणजे केवळ एखादा अवयव स्वच्छ असणे नव्हे, तर आर्तव (मासिक पाळी), गर्भाशय, अंडाशय, ‘हार्मोन्स’ (संप्रेरके), दोष, धातू आणि स्रोतस यांचे संतुलन राखणे होय. त्यामुळे गर्भाशय शुद्धीकरण, म्हणजे एखादी जादुई प्रक्रिया नसून शरिरातील दोष, आम (विषद्रव्ये) आणि स्रोतसातील अडथळे दूर करून स्त्रीच्या प्रजनन आरोग्याचे संवर्धन करणे होय.

१. गर्भाशय शुद्धीकरण म्हणजे काय ?

आधुनिक वैद्यकशास्त्रात निरोगी गर्भाशयाला नियमितपणे ‘डिटॉक्स’ (शुद्धीकरण) करण्याची आवश्यकता असल्याचा कोणताही सर्वसाधारण सिद्धांत नाही. गर्भाशय स्वतःची स्वच्छता आणि पुनर्निर्मिती मासिक पाळीद्वारे नैसर्गिकरित्या करत असतो.

आयुर्वेदाच्या दृष्टीने शुद्धीकरण, म्हणजे दोष संतुलित करणे, आर्तव वह स्रोतस स्वच्छ ठेवणे, पचनशक्ती (अग्नी) सुधारणे, आम न्यून करणे, गर्भाशय आणि प्रजनन संस्थेला योग्य पोषण देणे.

२. कोणत्या परिस्थितीत गर्भाशयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे ?

मासिक पाळी अनियमित असणे, पाळीत गुठळ्या येणे, ‘पॉलीसिस्टीक ओवॅरीयन सिंड्रोम’ किंवा ‘पॉलीसिस्टीक ओवॅरीयन डिसिज’, गर्भाशयातील ‘फायब्रॉईड्स’, ‘एंडोमेट्रिओसिस’ (स्त्रियांमधील एक वेदनादायी आजार), वारंवार गर्भपात, गर्भधारणेत अडचणी, पांढर्‍या पाण्याचा त्रास, प्रसूतीनंतरचा काळ

३. लक्षणे

गर्भाशयाच्या आरोग्यात बिघाडाची संकेत, पाळी अनियमित होणे, अधिक  किंवा अल्प रक्तस्राव, पाळीच्या कालावधीत तीव्र वेदना, ओटीपोटात जडपणा, पांढरे पाणी, कंबरदुखी, थकवा आणि गर्भधारणेत अडथळे, ही काही प्रमुख लक्षणे होत.

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

४. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

अ. अपान वात विकृती : अपान वात हा प्रजनन आणि मासिक पाळीच्या कार्यासाठी उत्तरदायी असतो. त्याचे संतुलन बिघडल्यास पाळी आणि गर्भधारणा यांवर परिणाम होतो.

आ. कफदोष वाढ : कफ वाढल्याने स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण होतो. यामुळे ‘सिस्ट’, ‘फायब्रॉईड्स’ किंवा पाळीतील अडथळे निर्माण होऊ शकतात.

इ. पित्तदोष असंतुलन : अधिक रक्तस्राव, दाह आणि जळजळ निर्माण होऊ शकते.

ई. आम निर्मिती : अपूर्ण पचनामुळे सिद्ध झालेले आम शरिरातील विविध स्रोतसांमध्ये अडथळे निर्माण करते.

५. आयुर्वेदानुसार चिकित्सेत विचार करतांना

उपचार करण्यापूर्वी ‘स्त्रीची प्रकृती (वात-पित्त-कफ), पाळीचा इतिहास, गर्भधारणेचा इतिहास, वजन, पचनशक्ती (अग्नी), मानसिक ताण, निदान अहवाल (जर उपलब्ध असतील)’, या गोष्टींचे मूल्यांकन महत्त्वाचे असते.

६. मुख्य उद्देश 

अपान वात संतुलन + स्रोतस शुद्धी + आम पाचन + गर्भाशय पोषण

७. आयुर्वेदाची उपचारपद्धत

अ. शोधन चिकित्सा (पंचकर्म) : योग्य रुग्ण निवडीनुसार –

अ १. विरेचन : पित्त आणि रक्तदोष संतुलन, दाह न्यून करण्यास साहाय्य

अ २. बस्ती : अपान वात संतुलित करण्यासाठी, स्त्रीरोगांमध्ये अत्यंत महत्त्वाची चिकित्सा

अ ३. उत्तर बस्ती : विशिष्ट स्त्रीरोगांमध्ये तज्ञ आयुर्वेद चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली.

आ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

आ १. अशोक : गर्भाशय आरोग्यासाठी

आ २. लोध्र : आर्तव संतुलन

आ ३. शतावरी : स्त्री प्रजनन आरोग्य

आ ४. मंजिष्ठा : रक्तशुद्धी

आ ५. गुडुची : रोगप्रतिकारशक्ती

आ ६. त्रिफळा : आम पाचन आणि स्रोतस शुद्धी

८. घरगुती आयुर्वेदाचे उपाय

प्रतिदिन कोमट पाणी पिणे, नियमित चालणे आणि व्यायाम, योगासन (तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली), ध्यान अन् प्राणायाम, वजन नियंत्रण ठेवणे

९. आहार मार्गदर्शन

अ. काय घ्यावे ? : ताजे आणि गरम अन्न, फळभाज्या, फळे, मूगडाळ, तूप (योग्य प्रमाणात)

आ. काय टाळावे ? : जंक फूड (पिझ्झा, बर्गर), बेकरी पदार्थ, अधिक साखर, शीतपेये, अतीतेलकट पदार्थ

१०. काही महत्त्वाचे गैरसमज

अ. प्रत्येक स्त्रीला ‘गर्भाशय डिटॉक्स’ करण्याची आवश्यकता असते.

आ. इंटरनेटवरील सर्व ‘डिटॉक्स ड्रिंक्स’ सुरक्षित असतात.

इ. केवळ घेतल्याने सर्व स्त्रीरोग बरे होतात.

ई. प्रत्यक्षात योग्य निदान, दोषांचे मूल्यांकन आणि वैद्यकीय मार्गदर्शन महत्त्वाचे असते.

११. निष्कर्ष

गर्भाशय शुद्धीकरण, म्हणजे एखादी फॅशन किंवा तात्पुरता ‘ट्रेंड’ नसून स्त्रीच्या संपूर्ण प्रजनन आरोग्याची काळजी घेण्याची प्रक्रिया आहे. आयुर्वेद शरिरातील दोष संतुलित करून, पचन सुधारून आणि गर्भाशयाला योग्य पोषण देऊन दीर्घकालीन आरोग्य साध्य करण्याचा मार्ग दाखवतो. योग्य आहार, जीवनशैली, पंचकर्म आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्त्रीचे प्रजनन आरोग्य अधिक सक्षम अन् निरोगी राहू शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.