परदेशी वृत्तमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे सामर्थ्य !

काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील एका वृत्तमाध्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांविषयी लेख प्रकाशित केला. त्या लेखात ‘भारतात उभारले जाणारे छत्रपती शिवरायांचे पुतळे मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करतात’, असा दावा करण्यात आला; मात्र इतिहासाचा पुरेसा अभ्यास न करता केलेली ही मांडणी वास्तवापासून दूर असल्याचे दिसून येते. खरा प्रश्न त्या लेखाचा नाही, तर छत्रपती शिवरायांविषयी अर्धवट माहितीच्या आधारावर भाष्य करण्याचा आहे. ‘छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून न घेता त्यांच्यावर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार फ्रान्समधील त्या वृत्तमाध्यमाला कुणी दिला ?’ हा प्रश्न आज सर्वांच्या मनात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज

१. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांची भीती कि त्यांच्या इतिहासाची ?

फ्रेंच वृत्तमाध्यमाच्या मते छत्रपती शिवरायांचे पुतळे भीती निर्माण करतात; पण भीती नेमकी कशाची ? एका दगडाच्या पुतळ्याची कि त्या पुतळ्यामागील इतिहासाची ? छत्रपती शिवरायांनी आदिलशाही, निजामशाही, कुतूबशाही आणि मोगल अशा अनेक सत्तांना आव्हान देत हिंदवी स्वराज्य उभे केले. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहून जर कुणाला अस्वस्थता वाटत असेल, तर ती पुतळ्याची नाही, तर ती त्यांच्या पराक्रमाची आणि आज जागृत होत असलेल्या हिंदूंची आहे.

२. छत्रपती शिवरायांनाच लक्ष्य का केले जाते ? (पुतळ्यांचे जागतिक वास्तव)

कु. पार्थ घनवट

जगभर राष्ट्रपुरुषांचे आणि विविध विचारसरणीच्या नेत्यांचे पुतळे उभे आहेत. मग आक्षेप केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवरच का ?

अ. लेनिन आणि साम्यवादी नेते यांचे पुतळे : रशिया आणि पूर्व युरोपसह जगभरात साम्यवादी हुकूमशहा व्लादिमीर लेनिनचे अनुमाने ७ सहस्रांहून अधिक पुतळे उभारले गेले. ज्या विचारसरणीने कोट्यवधी निष्पापांच्या हत्या झाल्या वा ठार मारले, त्यांच्या पुतळ्यांची पाश्चात्त्यांना कधी भीती वाटली नाही.

आ. हिटलर आणि नाझी स्मारके : लाखो ज्यूंची कत्तल करणार्‍या हिटलरची नाझी चिन्हे आणि त्याचे पुतळे युरोपच्या इतिहासाला काळिमा फासणारे ठरले, तरीही युरोपने स्वतःच्या भूमीवरील आक्रमक विचारसरणीकडे डोळेझाक केली.

इ. नेपोलियन आणि चर्चिल : नेपोलियन आणि विन्स्टन चर्चिल यांच्या स्मारकांमध्ये भीती दिसत नाही; पण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांमध्ये दिसते, हा कोणता अभ्यास ?

भारतात आज गल्लीबोळापासून गडदुर्गांपर्यंत छत्रपती शिवरायांचे लाखो पुतळे आणि स्मारके आहेत. अधिकृत आणि अनधिकृत आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात छत्रपती शिवरायांची लहान-मोठी अशी अनुमाने ५ लाखांपेक्षा अधिक स्मारके आणि पुतळे अभिमानाने उभे आहेत. खरेतर समस्या पुतळ्यांची नाही. समस्या त्या इतिहासाची आहे, ज्याने बलाढ्य सत्तांना गुडघ्यावर आणले आणि स्वराज्याची स्थापना केली.

३. छत्रपती शिवरायांचा पुतळा, म्हणजे हिंदु युवा आणि भारतीय सैन्य यांचे परम प्रेरणास्थान !

हिंदु संस्कृतीत पुतळ्यांना केवळ दगडाची प्रतिकृती मानले जात नाही, तर ते ‘संस्कार केंद्र’ आणि ऊर्जेचा महामेरू आहेत. आजही कोणताही हिंदु युवक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जातो, तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि तो नतमस्तक होऊन स्वतःची मान झुकवून महाराजांना ‘मानाचा मुजरा’ (मानवंदना) करतो. हिंदु समाजातील कुठल्याही ऐतिहासिक, सामाजिक किंवा राष्ट्रप्रेमी प्रेरणादायी कार्याचा प्रारंभ त्यांना मानवंदना देऊनच होत असते. येथूनच हिंदु युवकांना धर्मरक्षणाची खरी प्रेरणा मिळते.

केवळ सर्वसामान्य हिंदूच नव्हे, तर भारताचे रक्षण करणारे आपले शूर सैन्यही (भारतीय सैन्य दल) छत्रपती शिवरायांना ‘सर्वोच्च आदर्श’ मानते. म्हणूनच देशाच्या रक्षणासाठी सियाचीन किंवा लडाख यांसारख्या अत्यंत दुर्गम, हाडे गोठवणार्‍या उणे तापमानाच्या सीमांवरही भारतीय लष्कराने छत्रपती शिवरायांचे पुतळे अत्यंत अभिमानाने उभारले आहेत. शत्रूच्या समोर छाती ताणून उभे रहातांना भारतीय सैन्यासाठी हे पुतळे एक महान प्रेरणास्थान आणि आदर्श बनले आहेत. व्हिएतनाम आणि इस्रायल यांसारखे देश छत्रपती शिवरायांना लढायांमधील आदर्श मानून त्यांच्या प्रेरणेने शत्रूंवर तुटून पडतो.

४. विजय कुणाचा ?

फ्रान्समधील त्या वृत्तमाध्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाष्य करण्यापूर्वी त्यांचा इतिहास समजून घ्यायला हवा होता; कारण त्यांची उंची कोणत्याही परदेशी वर्तमानपत्राच्या मतावर ठरत नाही. या संपूर्ण वादात जर विजय कुणाचा झाला असेल, तर तो छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, त्यांनी शिकवलेल्या ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या बाण्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या पवित्र विचारांचा आहे.

जय भवानी ! जय शिवराय !

– श्री. पार्थ सुनील घनवट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२६)