श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जळगाव येथील दौर्‍याच्या वेळी तेथील साधकांनी अनुभवलेले त्यांचे दिव्यत्व !

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे जळगावला आगमन होण्यापूर्वी आणि त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीत वातावरणात झालेले आश्चर्यकारक पालट

सौ. क्षिप्रा जुवेकर

१ अ. उन्हाळ्याचे दिवस असतांनाही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा  सिंगबाळ यांच्या आगमनापूर्वी जोराने वारा वहाणे आणि पाऊस पडणे : ‘१९ ते २२.३.२०२३ या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सौ. शौर्या सुनील मेहता (वास्तूविशारद, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ४७ वर्षे) जळगाव सेवाकेंद्रात आल्या होत्या. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनापूर्वीच वातावरणात आश्चर्यकारक पालट होऊ लागले. त्या कालावधीत जळगावमध्ये पुष्कळ उष्णता होती; परंतु त्या ज्या दिवशी येणार होत्या, त्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून अकस्मात् जोराने वारा वाहू लागला आणि थोडासा पाऊस पडला. वास्तविक त्या वेळी पावसाची काही चिन्हे दिसत नव्हती. या मोसमात येथे पाऊस कधीच पडत नसतो; परंतु त्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर वातावरणात पुष्कळ पालट झाला. वार्‍याचा वेग एवढा होता की, त्या वेळी रस्त्यावरून चालणार्‍यांना वाटेतच थांबावे लागले. ‘वायुदेवता जळगावचे वातावरण स्वच्छ करत आहे’, असे मला वाटले. वायुदेवतेची सेवा झाल्यानंतर वरुणदेवतेने पाऊस पाडून जळगावची शुद्धी केली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ रात्री ९ वाजता आगगाडीने जळगावला येणार होत्या. त्यांना आश्रमात घेऊन येण्यासाठी आम्ही आगगाडी स्थानकावर गेलो होतो. आगगाडी येण्याच्या ३० मिनिटे आधी तेथे पाऊस पडत होता.

१ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या जळगाव येथील वास्तव्याच्या कालावधीत वातावरण थंड रहाणे : माझे यजमान श्री. प्रशांत जुवेकर आणि मी एकमेकांशी बोलत होतो, ‘‘जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची आगगाडी जळगाव स्थानकावर पोचेल, त्याच वेळी वरुणदेवाची सेवा समाप्त होईल.’’ त्यानंतर आगगाडी जळगाव रेल्वेस्थानकावर पोचण्याआधी ५ मिनिटे पाऊस थांबला. वातावरण एवढे गार झाले होते की, ‘जणूकाही आम्ही हिमालयातच आहोत’, असे आम्हाला वाटत होते. जळगावमध्ये नेहमी या मासात अधिक उष्णता असते; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आगमनापूर्वी जो अभूतपूर्व पालट झाला, तो खरोखर बुद्धीपलीकडचा होता. त्या २ दिवस जळगावमध्ये होत्या. ते दोन्ही दिवस वातावरण थंडच होते.

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे), जळगाव (४.८.२०२३)

२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दैवी अस्तित्वाची साधकांना आलेली प्रचीती !

२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भूमीपूजन करत असतांना पक्ष्यांनी त्यांना घिरट्या घालणे : दुसर्‍या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ जळगाव सेवाकेंद्रासाठी घेतलेली भूमी पहायला नांद्रा या गावी गेल्या. तेथे त्यांनी भूमीपूजन केले. त्या वेळी काही पक्षी त्यांच्या जवळ येत होते. ते पुनःपुन्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या अगदी जवळ येऊन त्यांना घिरट्या घालत उडत होते.

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी शेतातील गव्हाच्या रोपांना स्पर्श केल्यावर ते रोप त्यांच्या बाजूला झुकणे : भूमीपूजन केल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भूमी पहाण्यासाठी शेतात गेल्या. त्या वेळी शेतात गहू आणि ज्वारी यांचे पीक लावले होते. भूमी पहातांना त्या गव्हाच्या पिकाला हात लावत होत्या. तेव्हा गव्हाचे ताट (गव्हाची रोपे) त्यांच्या बाजूला झुकले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा ‘ही भूमी सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरूंची आहे. त्यामुळे येथे उगवलेले पीकही साधक आहे’, असा भाव होता. त्यांना पिकांविषयी प्रीती वाटत होती. त्यामुळे ‘त्या शेतातील लहान लहान रोपांनाही त्यांचा स्पर्श हवाहवासा वाटत आहे’, असे मला जाणवत होते.

२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या उजव्या पायातील पादत्राणाचा तळ वेगळा होऊन तो भूमीत अडकल्याने तेथे चिन्ह उमटणे आणि हे शुभ चिन्ह असल्याचे महर्षींनी सांगणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ शेतात फिरत असतांना त्यांच्या उजव्या पायातील पादत्राणाचा तळ (सोल) वेगळा होऊन शेतातील मातीत पडला. साधारणपणे पादत्राण तुटल्यावर त्याचा काही भाग तुटतो; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या पादत्राणाचा खालचा संपूर्ण तळ निघाला होता. तो भूमीत अडकून तेथे चिन्ह उमटले. ‘जणू श्री लक्ष्मीदेवीने आपले पदचिन्ह तेथे ठेवले आहे’, असे मला वाटले. त्यांची ती पादत्राणे आम्ही संग्रहात ठेवली आहेत. महर्षींना हा प्रसंग सांगितल्यावर त्यांनी नाडीपट्टीच्या माध्यामातून सांगितले, ‘हे शुभ चिन्ह आहे.’ साधकांना वाटले, ‘जळगाव सेवाकेंद्राच्या भूमीवर साक्षात् श्री महालक्ष्मीने आशीर्वाद स्वरूपात तिचे पदचिन्ह उमटवले आहे.’ यावरून ‘येथे सदैव देवीचा वास असेल’, असे मला वाटते.

२ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सूर्यफुलांचे पीक पहाण्यासाठी गेल्यावर तेथील केवळ एक फूल ताठ उभे असलेले दिसणे आणि ते फूल सेवाकेंद्रात आणल्यावर ४ दिवस ताजे रहाणे : दुपारी १ वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सेवाकेंद्राची भूमी पाहून परत जात असतांना एका शेतात सूर्यफुलांचे पीक दिसले. ते पहाण्यासाठी आम्ही थांबलो. सर्व फुले खाली झुकलेली होती; परंतु एकच फूल रस्त्याकडे मुख करून ताठ उभे होते. ते पहाताच श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्याच्या जवळ गेल्या. आम्ही त्यांची फुलाच्या समवेत छायाचित्रे काढली. नंतर आम्ही ते फूल आश्रमात घेऊन आलो. वास्तविक सूर्यफूल झाडापासून वेगळे झाल्यानंतर लवकर कोमेजून जाते; परंतु हे फूल ४ दिवस ताजे राहिले होते. त्या फुलाकडे पहाताच साधकांची भावजागृती होत होती. ‘त्या फुलाचे जीवन सार्थक झाले’, असे मला वाटले.

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे), जळगाव (४.८.२०२३)

३. ‘गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा आशीर्वाद मिळण्याची इच्छा पूर्ण होणे !

२२.३.२०२३ या दिवशी सकाळीच त्या जळगावहून पुढे मार्गस्थ झाल्या. २२.३.२०२३ या दिवशी गुढीपाडवा होता. ‘त्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ थांबल्या असत्या, तर आणखी आनंद मिळाला असता’, असा विचार आम्हा सर्वांच्या मनात होता. त्यांची आगगाडी पहाटे ५.५० वाजता निघणार होती. जेव्हा आम्ही दोघे (श्री. प्रशांत जुवेकर आणि सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर) अन् सद्गुरु नंदकुमार जाधव त्यांना जळगाव रेल्वेस्थानकावर सोडायला गेलो. तेव्हा आम्ही आमची इच्छा त्यांच्या जवळ व्यक्त केली. त्यावर त्यांनी प्रसन्नतेने स्मित केले. नंतर त्यांनी ‘सूर्योदय किती वाजता आहे ?’, असे आम्हाला विचारले. ‘सूर्याेदय सकाळी ६.३० वाजता होईल’, असे आम्ही त्यांना सांगितले. नंतर त्या आम्हाला त्यांचे काही अनुभव सांगत होत्या. त्यात थोडा वेळ गेला आणि आगगाडी सकाळी ६.२५ वाजता जळगाव स्थानकावर आली. खरेतर ती आगगाडी कधीच उशिरा येत नाही आणि नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ थांबतही नाही. जळगावमध्ये ती आगगाडी केवळ २ मिनिटे थांबते, तरीही त्या दिवशी ती आगागडी सकाळी ६.३३ वाजेपर्यंत, म्हणजे ८ मिनिटे थांबली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. ‘गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळावा’, ही आमची इच्छा पूर्ण करून त्यांनी आम्हाला आनंद दिला. यातून आम्ही ‘पंचमहाभूते आणि संपूर्ण ब्रह्मांड यांवर त्यांचे स्वामित्व कसे आहे !’, याची अनुभूती घेतली.

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे), जळगाव (४.८.२०२३)

‘आज्ञापालन’ हा गुण पुरेपूर असणार्‍या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन  लक्षपूर्वक ऐकतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

अध्यात्मात ‘आज्ञापालन’ हा सर्व गुणांचा राजा आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात ‘आज्ञापालन’ हा गुण पुरेपूर आहे. ‘जाणूनी गुरूंचे मनोगत’, या आज्ञापालनातील पुढच्या टप्प्यानुसार त्या गुरूंना आवडेल अशी सेवा करतात.