मुंबई – धारावी येथील ‘मेहबूब ए सुभानिया’ या मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना स्थानिक मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात विरोध करून बांधकाम तोडण्यास दिले नव्हते. ३० सप्टेंबर या दिवशी या मशिदीच्या ट्रस्टकडून स्वत:हून हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकार्यांना विरोध करण्यासाठी धारावी येथे सहस्रावधींच्या संख्येत मुसलमान रस्त्यावर उतरले होते. या वेळी कारवाई न करता मागे फिरलेल्या प्रशासनाने अनधिकृत बांधकात तोडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत स्वत:हून अनधिकृत बांधकाम न तोडल्यास प्रशासनाकडून अनधिकृत बांधकाम तोडले जाणार होते. प्रशासनाने पाठवलेल्या नोटिशीनुसार मशिदीच्या विश्वस्तांनी स्वत:हून मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती.