पंढरपूर – अवैध वाळूउपसा आणि वाहतूक यांच्या विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. शेगाव दुमाला येथे भीमा नदीपात्रात महसूल पथकाने अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ३ ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले. याचसमवेत शिरढोण येथे भीमा नदीपात्रात एक लाकडी होडी नष्ट करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथकांची नेमणूक केली आहे. त्यासाठी प्रतिदिन रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत, तसेच दिवसा उत्खनन आणि वाहतूक होत असलेल्या ठिकाणी धाडी घातल्या जात आहेत. संबंधित वाहनांच्या मालकांवर ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा’तील प्रावधानांनुसार दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही चालू आहे.